Dnyanjyot Cricket Mahotsav : महाराष्ट्रातील स्वच्छ गावांमध्ये नावाजलेले ‘बापर्डे-जुवेश्वर’ गाव ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026’ मुळे अर्धिक चर्चेत आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा थाटात समारोप झाला. संत गाडगेबाबा अभियानात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त या गावाने सामाजिक एकजूटीनंतर आता शिक्षणासाठी एक नवा आदर्श उभा केला आहे. गावातील विनाअनुदानित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयाला आर्थिक बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार आणि उत्स्फूर्त वातावरणात समारोप करण्यात आला.
सलग पाच दिवस रंगलेल्या या क्रिकेट महोत्सवात खेळाचा थरार, प्रेक्षकांचा उत्साह आणि सामाजिक भान यांचे अनोखे संमेलन पाहायला मिळाले. अंतिम सामन्यात भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11, सावंतवाडी संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आणि रोख 2.50 लाख रुपये व भव्य चषकावर आपले नाव कोरले. उपविजेतेपदाचा मान अवधूत स्पोर्ट्स, कणकवली संघाने पटकावला.
हेही वाचा – ऑटो चालवणाऱ्या या महिलेला थेट राष्ट्रपती भवनातून फोन! चहापानाचं खास आमंत्रण, कारण ऐकून डोळे पाणावतील!
‘बापर्डे-जुवेश्वर’ची महाराष्ट्रभर चर्चा
‘बापर्डे-जुवेश्वर’ गावाने या स्पर्धेच्या माध्यमातून ‘खेळातून शिक्षणासाठी निधी’ हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांचा उपक्रम महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला असून, ऑनलाइन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी या महोत्सवाला दाद देत अनेक विक्रम मोडले.
‘अण्णाभाऊ क्रींडागणा’ची चर्चा!
7 ते 11 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव पार पडला, यासाठी गावाने प्रथमच एक ऑल इंडिया टेनिस स्पर्धेसाठी ‘अण्णाभाऊ क्रींडागण’ उभे केले. जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटपटू संतोष नाईकधुरे आणि अमोल घाडी यांच्या नेतृत्वाखाली गटाने मेहनतीचे प्रात्यक्षिक दाखवून या मैदानासाठी घाम गाळला. या मैदानाचे फोटो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यातील एक मोठे मैदान म्हणूनही त्याची विशेष ओळख बनली.
मुंबईतील प्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलचे डॉ. सुरेश जोशी, डॉ. किरण लडकत आणि उपेंद्र भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. पहिल्याच दिवशी रात्रीच्या वेळीही क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळल्याने संपूर्ण स्पर्धाकाळात उत्साहाचे वातावरण कायम राहिले.
राजेंद्र नाईकधुरे यांच्या नेतृत्वात यशस्वी आयोजन
स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असतानाही स्पर्धाध्यक्ष राजेंद्र नाईकधुरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील चाकरमानी, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी हे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले. मागील 12 वर्षे मोफत शिक्षण देणाऱ्या गावातील शाळेसाठी खेळाच्या माध्यमातून निधी उभारण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याला जसलोक हॉस्पिटलचे डॉ. किरण लडकत, डॉ. मनीष कोठारी, श्री. सुहास राणे, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, संस्थाध्यक्ष बाबुराव राणे, मुंबई अध्यक्ष सत्यवान नाईकधुरे, सरपंच संजय हनुमंत लाड यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळापलीकडची भूमिका
पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती आणि सुहास राणे यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांचे पाठबळ लाभलेल्या या शैक्षणिक संस्थेसाठी राबवलेला ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव’ केवळ स्पर्धा न राहता एक सामाजिक चळवळ ठरला आहे. या स्पर्धेतून जमा होणारा संपूर्ण निधी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी वापरण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण गावावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा