उघड्या खड्ड्यात पडून HDFC बँकेतील अधिकाऱ्याचा मृत्यू!

WhatsApp Group

HDFC Bank Assistant Manager Death : दिल्लीतील जनकपुरी परिसरात शासकीय यंत्रणेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका तरुण बँक अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. एचडीएफसी बँकेच्या रोहिणी शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले कमल हे दुचाकीवरून घरी परतत असताना दिल्ली जल मंडळाने खोदलेल्या आणि उघड्या ठेवलेल्या खड्ड्यात पडले, त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कमल हे मूळचे पालम परिसरातील रहिवासी होते. बुधवारी रात्री घरी निघताना त्यांनी आपल्या जुळ्या भावाला, करण याला “दहा मिनिटांत घरी पोहोचतो” असे सांगितले होते. मात्र तो दहा मिनिटांचा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकला नाही. काही वेळानंतर कमलचा मोबाईल फोन सतत वाजत राहिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्या क्षणापासून कुटुंबीयांची चिंता वाढत गेली.

उघड्या खड्ड्यातून सापडला मृतदेह

नंतर कमलचा मृतदेह दिल्ली जल मंडळाच्या सुरू असलेल्या बांधकामस्थळी असलेल्या खोल खड्ड्यातून सापडला. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रात्री त्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला होता आणि त्या खड्ड्यातही डोकावले होते. मात्र त्या वेळी मृतदेह न सापडल्यामुळे कमल रात्री बराच वेळ जखमी अवस्थेत तिथेच तडफडत राहिला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – मांडवी एक्सप्रेसची वेळ ‘कागदावरच’! रोज 3–4 तास उशीर, कोकण प्रवाशांचा अंतहीन छळ!

पोलीस ठाण्यांचे फेरे, पण मदत नाही

कमल बेपत्ता झाल्यानंतर त्याचे नातेवाईक रात्रीभर एकामागून एक अनेक पोलीस ठाण्यांचे फेरे मारत राहिले, मात्र कुठूनही ठोस मदत मिळाली नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे की, वेळेवर मदत मिळाली असती, तर कदाचित कमलचा जीव वाचू शकला असता. शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे एका तरुणाचा जीव गेला, असा संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळी सात वाजता आलेला मृत्यूचा फोन

संपूर्ण रात्र शोध सुरू असतानाच सकाळी सुमारे सात वाजता पोलिसांचा फोन आला, आणि कमलचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. ही बातमी ऐकताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

स्थानिकांचा गंभीर आरोप

स्थानिक नागरिकांनीही या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. खड्डा झाकलेला नव्हता, कोणतेही इशारा फलक, संरक्षक अडथळे किंवा प्रकाशयोजना नव्हती, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या अंधारात येणाऱ्या वाहनचालकांसाठी हा परिसर मृत्यूचा सापळा ठरला.

नोएडामधील युवराजच्या मृत्यूनंतर घडलेली ही घटना शासकीय निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांचे जीव किती असुरक्षित आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment