Ranchi RIMS Student Poisoned : झारखंडची राजधानी रांची येथील प्रसिद्ध राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनाकोलॉजी विभागात पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेल्या 25 वर्षांच्या विद्यार्थिनीची कॉलेज कँटीनमधील चहा प्यायल्यानंतर अचानक तब्येत बिघडली असून, सध्या तिच्यावर वेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात चहामध्ये विष मिसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
चहातच विष? गंध आणि चव दोन्ही विचित्र…
21 ऑगस्टच्या रात्री, संबंधित विद्यार्थिनीने ड्युटी संपल्यानंतर कॉलेज कँटीनमधून चहा मागवला होता. फ्लास्कमध्ये ठेवलेला चहा पिल्यानंतर अवघ्या काही घोटांमध्येच तिला चव आणि वास विचित्र वाटल्याची तक्रार केली. चहामध्ये केरोसीनसारखी दुर्गंधी येत असल्याची तिने अन्य सहकाऱ्यांना सांगितले होते. काही क्षणातच तिचा श्वास घ्यायचा त्रास सुरू झाला आणि ती बेशुद्ध झाली.
वेंटिलेटरवर जीवन-मरणाची झुंज
RIMS चे जनसंपर्क अधिकारी डॉ. राजीव रंजन यांनी सांगितले की, पीडित विद्यार्थिनी सध्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये वेंटिलेटर सपोर्टवर असून तिची स्थिती गंभीर आहे. तपासासाठी फ्लास्क आणि इतर वस्तू टॉक्सिकोलॉजी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रथमदर्शनी ही विषप्रयोगाची घटना असल्याचा संशय आहे.
हेही वाचा – VIDEO : मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रोहित शर्मा अडकला, पण त्याने चाहत्यांची मनेही जिंकली!
पोलिसांनी कँटीन कर्मचारी घेतला ताब्यात
या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस तपास करत असून चहा बनवणाऱ्या कँटीन कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्यमंत्र्यांचा संताप! कँटीन सील, परवाना रद्द
झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अंसारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, “कँटीनचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला असून, संपूर्ण कँटीन सील करण्यात आले आहे.” इतकेच नव्हे तर त्यांनी RIMS चे संचालक यांच्यावरही गंभीर आरोप करत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे संचालकाच्या तात्काळ बडतर्फीची मागणी केली आहे.
इरफान अंसारी म्हणाले, “या घटनेची मी स्वत: निगराणी करत आहे. कोणताही दोषी सुटणार नाही. नियमभंग झाला असल्यास, कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा