VIDEO : पाकिस्तानच्या यासिर शाहनं टाकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’; सर्वांना आठवला शेन वॉर्न!

WhatsApp Group

मुंबई : यासिर शाह हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा नियमित सदस्य नसला तरी जेव्हा जेव्हा त्याला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केलं जातं तेव्हा तो त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो. लेग-स्पिनर यासिर शाहनं केवळ १७ सामन्यांमध्ये १०० कसोटी बळी पूर्ण केले आणि शतक पूर्ण करणारा संयुक्त दुसरा वेगवान गोलंदाज बनला. दरम्यान, गॉल येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यासिर शाहनं कुसल मेंडिसला शानदार चेंडू टाकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हटलं जात आहे.

यासिर शाहनं ज्या पद्धतीनं श्रीलंकेचा बॅट्समन कुसल मेंडिसला आऊट केलं, ते पाहून ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लेगस्पिनर शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’च्या आठवणी ताज्या झाल्या. १९९३च्या ऍशेस मालिकेत वॉर्ननं इंग्लिश फलंदाज माईक गॅटिंगला आऊट केलं होतं, ज्याला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ हा किताब देण्यात आला होता. तसं, यासिर शाहनं पाकिस्तानला महत्त्वाचं यश मिळवून दिलं, कारण कुसल मेंडिस चांगली फलंदाजी करून पाहुण्या संघापासून सामना हिरावून घेत होता. श्रीलंका संघाकडं आता ३०० धावांची आघाडी आहे.

‘बॉल ऑफ द सेंच्युरी’

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील ५६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर यासिर शाहनं कुसल मेंडिसला क्लीन बोल्ड केलं. मेंडिसने १२६ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीनं ७६ धावा केल्या. शाहनं चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर टाकला, जो पटकन वळला आणि ऑफ-स्टंपकडं गेला. अशाप्रकारे यासिर शाहनं जवळपास तीन दशकांपूर्वीच्या शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’च्या आठवणींना उजाळा दिला.

यासिर शाहनं घेतल्या तीन विकेट्स

यासिर शाहने २९ षटकात १२२ धावा देत तीन विकेट्स घेतल्या असून त्यात दोन मेडन्सचा समावेश आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव १०० षटकांत ३३७ धावांत आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर त्यांना ४० धावांची आघाडी मिळाली. अशा प्रकारे पाकिस्तानला पहिली कसोटी जिंकण्यासाठी ३४२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २२२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं पहिल्या डावात २१८ धावा केल्या.

यासिरचा विक्रम!

श्रीलंकेविरुद्ध यासिरनं पहिल्या डावात विकेट घेत एक खास विक्रम केला. ४६वी कसोटी खेळत असलेल्या या फिरकीपटूनं दिग्गज अब्दुल कादिर यांना मागं टाकत आपली २३७वी कसोटी विकेट पूर्ण केल्या. कादिर यांच्या नावावर २३६ विकेट्स आहेत. आता यासिर पाकिस्तानकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यात दानिश कनेरियाचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

Leave a comment