जॉन्सन अँड जॉन्सनवर ब्रिटनमध्ये तब्बल 10 हजार कोटींचा दावा! बेबी पावडरमुळे खरंच कॅन्सर होतो का?

WhatsApp Group

Johnson & Johnson : जगभरातील प्रसिद्ध अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडली आहे. यावेळी थेट ब्रिटनमध्ये 3 हजारांहून अधिक लोकांनी या कंपनीविरुद्ध इंग्लिश हायकोर्टात 14 ऑक्टोबर रोजी एकत्रित खटला दाखल केला आहे. या खटल्यात कंपनीवर आरोप करण्यात आला आहे की तिच्या प्रसिद्ध टॅल्कम पावडरमुळे कॅन्सर होऊ शकतो.

काय आहे आरोप?

केपी लॉ फर्मच्या वकिलांनी दाखल केलेल्या या खटल्यात म्हटले आहे की, जॉन्सन अँड जॉन्सनने जाणीवपूर्वक असा बेबी पावडर विकला ज्यामध्ये ‘अ‍ॅस्बेस्टॉस’ नावाचा धोकादायक खनिज घटक आढळतो. अ‍ॅस्बेस्टॉसला जागतिक आरोग्य संघटना (WHO) कॅन्सर निर्माण करणारे घटक मानते.

वकिलांच्या मते, कंपनीला 1960 च्या दशकापासूनच आपल्या टॅल्कम पावडरमध्ये ट्रेमोलाइट आणि अ‍ॅक्टिनोलाइट सारखे मिनरल्स असल्याचे माहीत होते. हे घटक सूक्ष्म धाग्यांच्या स्वरूपात असताना अ‍ॅस्बेस्टॉस बनतात आणि मानवाला कॅन्सरचा धोका निर्माण करतात.

तरीही कंपनीने चेतावणी दिली नाही

इतकं असूनही कंपनीने उत्पादन बाजारातून मागे घेतले नाही, उलट ते “शुद्ध आणि सुरक्षित” असल्याचे सांगून विक्री सुरू ठेवली. ब्रिटनमधील अनेक महिलांनी सांगितले की या पावडरच्या वापरामुळे त्यांना अंडाशयाचा कॅन्सर (Ovarian Cancer) आणि मेसोथेलिओमा (Mesothelioma) सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागला.

किती नुकसानभरपाई मागितली गेली आहे?

या खटल्यात मागितलेली नुकसानभरपाईची रक्कम तब्बल 1 बिलियन पाउंड्स (10,000 कोटी रुपयांहून अधिक) इतकी आहे. अमेरिकेत यापूर्वी हजारो अशा खटल्यांचा सामना कंपनीला करावा लागला आहे. 6 ऑक्टोबर 2025 रोजी अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीला Mae Moore नावाच्या महिलेला झालेल्या कॅन्सरप्रकरणी 966 मिलियन डॉलर (8 हजार कोटी रुपये) नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.

टॅल्क पावडरपासून कॉर्नस्टार्च पावडरपर्यंत प्रवास

विवाद वाढल्यानंतर कंपनीने 2020 मध्ये अमेरिकेत टॅल्क-आधारित पावडर विकणे थांबवले आणि त्याऐवजी कॉर्नस्टार्चवर आधारित पावडर लाँच केली. 2023 मध्ये ब्रिटनमध्येही हा बदल करण्यात आला. मात्र, टॅल्कम पावडरमधील अ‍ॅस्बेस्टॉसचे दावे कंपनीचा पाठलाग करतच आहेत.

अ‍ॅस्बेस्टॉस म्हणजे नेमकं काय?

 अ‍ॅस्बेस्टॉस हे नैसर्गिक खनिज आहे ज्याचे धागे अतिशय सूक्ष्म आणि हलके असतात. हे धागे जळत नाहीत, म्हणून पूर्वी याचा वापर इमारती आणि पाइप इन्सुलेशनसाठी होत असे. पण जुने अ‍ॅस्बेस्टॉस तुटल्यावर त्याचे सूक्ष्म तंतू हवेत मिसळतात आणि श्वासावाटे शरीरात गेले तर ते फुफ्फुसांमध्ये साचतात. तिथे दीर्घकाळ सूज राहून शेवटी कॅन्सर निर्माण होऊ शकतो.

टॅल्कम पावडर आणि कॅन्सरचा संबंध

टॅल्क हे देखील नैसर्गिक खनिज आहे आणि त्याच्या खाणी बहुतेकदा अ‍ॅस्बेस्टॉसच्या जवळ असतात. त्यामुळे पावडरमध्ये अ‍ॅस्बेस्टॉस मिसळण्याचा धोका असतो. अगदी थोड्या प्रमाणात अ‍ॅस्बेस्टॉस शरीरात गेल्यासही तो हानिकारक ठरतो.
या घटकामुळे मेसोथेलिओमा, फुफ्फुसाचा, घशाचा आणि ओवरीचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा धोका आणखीन वाढतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment