टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन

WhatsApp Group

Cyrus Mistry Died in Accident : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ पालघरमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. सायरस मिस्त्री आणि इतर चार जण पालघरच्या दिशेनं जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कंपनीच्या संचालकानं त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ५४ वर्षीय सायरस मिस्त्री हे पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे पुत्र होते, जे भारतीय वंशाचे सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली उद्योगपती होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. सायरस यांनी १९९१ मध्ये कुटुंबाच्या पालोनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

मिस्त्रींसोबत कोण कोण होतं?

अपघाताबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की सायरस मिस्त्री यांची कार महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दुभाजकावर आदळली. अधिकाऱ्यानं सांगितलं की, मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारनं जात होते. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी ३.१५च्या सुमारास हा अपघात झाला, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्यासोबत जहांगीर दिनशॉ पंडोल, अनाहिता पंडोल, दारियस पंडोल हे कारमध्ये होते. यापैकी सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचं निधन झालं आहे. उर्वरित दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 47 AB 6705 क्रमांकाची मर्सिडीज कार चारोटीजवळील पुलावरील दुभाजकावर आदळली.

२०१२ मध्ये टाटा सन्सचे चेअरमन

२००६ मध्ये, सायरस मिस्त्री टाटा सन्समध्ये रुजू झाले. यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये रतन टाटा यांच्या जागी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी मिस्त्रींची नियुक्ती करण्यात आली. टाटा सन्सचे अध्यक्ष बनल्यानंतर ४ वर्षांनी २०१६ मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आलं.  त्यांच्या आडनावात टाटा नसतानाही या गटाची कमान देण्यात आलेले ते दुसरे व्यक्ती होते. मिस्त्रींचे रतन टाटा यांच्याशी मतभेद झाले होते. डिसेंबर २०१९ मध्ये, कंपनी कायदा न्यायाधिकरणानं मिस्त्री यांना समूहाचे कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले. परंतु त्याआधी फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हटवण्यात आलं.

हेही वाचा – रतन टाटांचं २५ वर्षांच्या ‘दोस्ता’सोबत नवं स्टार्टअप! वाचाल तर तुम्हीही सलाम ठोकाल!

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते म्हणाले, “सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर त्यांच्याकडे एक तरुण, उज्ज्वल आणि भविष्यवादी व्यक्तिमत्व म्हणून उद्योगक्षेत्रात पाहिलं जात होतं. एका कुशल उद्योजकाचं निधन झालं आहे. ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही तर देशासाठीही मोठी आहे. भारताच्या औद्योगिक जगताचंही हे मोठं नुकसान आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment