मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकरांची माहिती

WhatsApp Group

Maharashtra government On Education In Marathi language : मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. भिवंडी तालुक्यातील काल्हेर जिल्हा परिषद शाळा येथे प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन, ठाणे जिल्हा परिषद आणि समग्र शिक्षण माझी ई- शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या वेळी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,प्रकल्प संचालक कैलास पगारे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार,पंचायत समितीचे सभापती भानुदास पाटील,प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे विश्वस्त राजेश टोकळे, प्रतोषी पांडा, काल्हेर ग्रामपंचायत सरपंच शिल्पा भोकरे,शाळेच्या मुख्यध्यापिका अश्विनी पालवटकर आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले की, मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. सर्व पुस्तके मातृभाषेत भाषांतरित करण्यात येणार आहेत. जिथे इटंरनेट सेवा नाही तिथे आम्ही सेटेलाईट वरुन सेवा देणार आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये जे आधुनिक आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहाेचवले जाईल. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील. शिक्षकाच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही सुरु आहे. शिक्षकाचे काम पुढची पिढी घडवणे हे आहे. शिक्षकांनी त्यांची समस्या आमच्याकडे मांडा. त्या सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. चागले शिक्षण मुलांना देणे ही आमची जबाबदारी आहे.

हेही वाचा – दिग्गज अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन..! मागे सोडून गेल्या ‘इतकी’ संपत्ती

माझी ई-शाळा या कार्यक्रमाच्या सहाय्याने शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, डिजिटल साधणे आणि त्यांचा वापर यामधील दरी कमी करणे, शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे या उद्दिष्टाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन आणि प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्यात ४ जिल्हयांमध्ये शासनाच्या ५०० शाळांमध्ये माझी ई-शाळा कार्यक्रम सुरु होत आहे. शालेय शिक्षकांच्या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांच्या शिक्षणाला देण्यासाठी हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. ५ हजार ई-शाळा, १० हजार डिजिटल क्लास रूम, २५ हजार शिक्षकांना प्रशिक्षण व ५ लाख विद्यर्थांना डिजिटल शिक्षण देण्याचे मिशन आहे, अशी माहिती जिंदल यांनी दिली.

Leave a comment