मांडवी एक्सप्रेसची वेळ ‘कागदावरच’! रोज 3–4 तास उशीर, कोकण प्रवाशांचा अंतहीन छळ!

WhatsApp Group

Mandovi Express Delay : कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच कोकण रेल्वेवरील गाडी क्रमांक 10103 मांडवी एक्सप्रेस सध्या प्रवाशांसाठी सुविधा न राहता मनस्तापाचं कारण ठरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही गाडी रोजच्या रोज 3 ते 4 तास उशिरा धावत असल्याने कोकण प्रवाशांचा संयम सुटू लागला आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मांडवी एक्सप्रेसची नियोजित सुटण्याची वेळ सकाळी 7 वाजून 10 मिनिटे अशी आहे. मात्र प्रत्यक्षात ही गाडी दररोज दुपारी 10 ते 10.30 दरम्यान, तर काही वेळा थेट 11 नंतरच सुटत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एका प्रवाशाच्या माहितीनुसार, काल ही गाडी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी, तर आज 11 वाजून 10 मिनिटांनी सुटली.

‘वेळापत्रक केवळ दिखावा?’

गेल्या संपूर्ण महिनाभर मांडवी एक्सप्रेसचा विलंब हा अपवाद नसून नियमच बनला आहे. त्यामुळे अधिकृत वेळापत्रक केवळ कागदावरच उरले असून, प्रवाशांसाठी त्याचा काहीही उपयोग राहिलेला नाही.

कोकण रेल्वे 19 जुलै 1990 पासून कार्यरत असून, मांडवी एक्सप्रेस 8 जून 1999 पासून सेवेत आहे. तीन दशकांचा अनुभव असूनही, ही गाडी आजही लांब पल्ल्याच्या व बाहेरच्या मार्गावरील गाड्यांसाठी वारंवार बाजूला केली जाते, हे कोकणवासीयांवर होत असलेलं अन्यायकारक वागणूक असल्याचं स्पष्ट होत आहे.

कोकण प्रवाशांचा प्रत्यक्ष त्रास

मांडवी एक्सप्रेसवर नोकरी, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि घरगुती कारणांसाठी हजारो कोकणवासी अवलंबून आहेत. आधीच तिकिटांची कमतरता, जनरल डब्यातील गर्दी, उभ्याने करावा लागणारा प्रवास—यावर कळस म्हणजे गाडी तासन्‌तास उशिरा धावते.

कोकणात एखादी ट्रेन उशिरा पोहोचली, की पुढे घर गाठण्यासाठी खासगी वाहन, रिक्षा किंवा जीपचा आधार घ्यावा लागतो. विशेष म्हणजे, या वाहनांचं भाडं अनेकदा ट्रेनच्या तिकिटापेक्षा दुप्पट असतं. रात्री उशिरा गाडी पोहोचल्यावर महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच मानसिक ताण, आर्थिक भार आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो.

‘कोकणकर दुय्यम नागरिक आहेत का?’

एका त्रस्त प्रवाशाने रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले आहे की, “मांडवी एक्सप्रेस ही स्थानिक कोकण प्रवाशांसाठी असताना, तिचा बळी नेहमी बाहेरच्या गाड्यांसाठी दिला जातो. हा कोकणवासीयांबाबत सावत्रपणाचाच प्रकार आहे.”

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत—

  • मांडवी एक्सप्रेसच्या मागील एक महिन्याच्या वेळपालनाचा तातडीने आढावा
  • कोकण मार्गावरील प्राधान्य व अनावश्यक थांब्यांचे पुनरावलोकन
  • सततच्या विलंबासाठी जबाबदारी निश्चित करणे

‘आम्हाला लक्झरी नको, वेळेचा सन्मान हवा’

प्रवाशांचा सवाल स्पष्ट आहे, “आम्ही ऐषआराम मागत नाही, आम्हाला फक्त वेळेवर चालणारी ट्रेन हवी आहे.”
मांडवी एक्सप्रेसवरील हा सातत्यपूर्ण अन्याय भारतीय रेल्वेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणारा ठरत असून, आता रेल्वे मंत्रालयाने याची तातडीने दखल घेणे अपरिहार्य बनले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment