मॉर्निंग वॉक ठरलं शेवटचं..! 73 वर्षीय आजीचा मृत्यू, पुण्यात हृदयद्रावक घटना!

WhatsApp Group

Pune Hit And Run : पुण्यातील पाशान रोड परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, सकाळच्या नियमित फिरायला गेलेल्या 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार, 24 जानेवारी रोजी पहाटे पाशान रोड–पंचवटी–NCL परिसरात घडली.

मृत महिलेचे नाव आशा विजयकुमार पाटील (वय 73) असे असून, गेल्या 10 वर्षांपासून त्या रोज पहाटे मॉर्निंग वॉकला जात असत. मात्र, तोच रोजचा दिनक्रम शनिवारी त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला.

हेही वाचा – AIIMS दिल्लीचा चमत्कार! पोटातून 19.9 किलोचा ट्यूमर काढला, स्टेज-IV कॅन्सरला हरवले!

मृत आशा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील (वय 51) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आई रोज सकाळी 5.30 वाजता घरातून निघायची आणि साधारण 6.30 ते 6.45 दरम्यान परत यायची. त्या दिवशी त्या एकट्याच बाहेर पडल्या होत्या.”

पंचवटी, NCL परिसर आणि पाशान रोड हे मार्ग त्या नियमितपणे वापरत असत आणि परिसरातील अनेक नागरिक त्यांना ओळखत होते.

7 वाजूनही परत न आल्याने कुटुंबीयांची धावपळ

सकाळी 7 वाजूनही आशा पाटील घरी न परतल्याने, त्यांचे पती विजय पाटील (वय 83) यांनी त्यांच्या नेहमीच्या मार्गांवर शोध घेतला. मात्र कुठेही त्यांचा मागमूस लागला नाही. दरम्यान, व्हॉट्सॲपवर एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये युनिव्हर्सिटी–पाशान रोडवरील आसरा मंदिराजवळ एका वृद्ध महिलेचा अपघात झाल्याची माहिती होती. फोटो पाहताच कुटुंबीयांनी त्यांची ओळख पटवली आणि तात्काळ ससून रुग्णालयात धाव घेतली.

रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू

डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, 108 रुग्णवाहिकेतून आणण्यात आलेल्या आशा पाटील यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला, ज्यामध्ये मृत्यूचे प्राथमिक कारण “शरीरावर झालेल्या अनेक गंभीर जखमा” असे नोंदवण्यात आले.

हिट-अँड-रनचा संशय, FIR दाखल

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यानुसार बेदरकार वाहनचालना, मदत न करता पळ काढणे, या कलमांखाली अज्ञात वाहनचालकाविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

अतुल पाटील यांनी सांगितले की, “अपघातानंतर काही नागरिक आणि सायकलस्वारांनी आईला मदत केली आणि पोलिसांना माहिती दिली. अपघात सकाळी 5.55 च्या सुमारास झाला, रुग्णवाहिका 6.23 ला, तर पोलीस 6.29 ला घटनास्थळी पोहोचले.”

संशय वाढवणारी बाब: ब्रेकचेही चिन्ह नाही!

या अपघाताबाबत कुटुंबीयांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. घटनास्थळी टायरचे ब्रेकचे कोणतेही निशाण नव्हते. वाहनाने वेग कमी केल्याचे पुरावे नाहीत. नंतर घटनास्थळी रक्ताचे डाग आढळले “यावरून असं वाटतं की वाहन थांबलंच नाही,” असे अतुल पाटील यांनी सांगितले.

CCTV नसल्याने तपासात अडथळा, पण शोध सुरू

चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढस यांनी सांगितले, “त्या ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यावर CCTV नाहीत. मात्र, आजूबाजूच्या चौकांवरील कॅमेरे तपासले जात आहेत. आरोपी वाहनाचा शोध सुरू आहे.”

पुण्यात वाढते हिट-अँड-रन अपघात, नागरिकांमध्ये भीती

या घटनेमुळे पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकाळी चालायला जाणेही आता जीवावर बेततेय का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment