

ENG vs AUS World Cup 2023 In Marathi : गतविजेता इंग्लंड संघ भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 मधून बाहेर पडला आहे. स्पर्धेत खराब कामगिरी केलेल्या इंग्लंडला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी मात खावी लागली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु इंग्लंड संघ 48.1 षटकात 253 धावांत ऑलआऊट झाला.
ऑस्ट्रेलियन संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. ऑस्ट्रेलिया पाच विजय आणि दोन पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा सात सामन्यांमधला हा सहावा पराभव असून ते शेवटच्या स्थानावर राहिले. इंग्लंडने सलग सहा सामने गमावले. या पराभवामुळे इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे.
इंग्लंडकडून बेन स्टोक्स फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 90 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 64 धावा केल्या. डेव्हिड मलाननेही 50 धावांची खेळी केली. मलानने 64 चेंडूंच्या खेळीत 4 आणि एक षटकार लगावला. मोईन अलीनेही 42 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – साताऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 38 धावांवर त्यांनी दोन गडी गमावले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी मिळून डाव सुधारला. लाबुशेन-स्मिथ यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी झाली. स्मिथ आणि जोश इंग्लिस बाद झाल्यानंतरही लाबुशेनची उत्कृष्ट फलंदाजी सुरूच होती. लाबुशेन आणि कॅमेरून ग्रीन यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली.
लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत आपल्या संघाला 286 धावांपर्यंत नेले. मार्नस लाबुशेनने 83 चेंडूंत सात चौकारांसह सर्वाधिक 71 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने पाच चौकारांच्या मदतीने 47 धावा आणि स्टीव्ह स्मिथने 44 धावा (52 चेंडू, तीन चौकार) केले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 4 खेळाडू बाद केले. तर आदिल रशीद आणि मार्क वुड यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!