पाकिस्तानचे कोच गॅरी कर्स्टन यांचा राजीनामा, 6 महिन्यातच सोडली नोकरी!

WhatsApp Group

Gary Kirsten : विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानची व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. रविवारी (27 ऑक्टोबर) लाहोरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. 32 वर्षीय रिझवान ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून कर्णधारपदाची इनिंग सुरू करणार आहे. दुसरीकडे, शान मसूद कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार राहील. आता एका दिवसानंतर पाकिस्तान क्रिकेटमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एप्रिल 2024 मध्ये दोन वर्षांच्या करारावर नियुक्ती केली होती, परंतु सहा महिन्यांनंतर त्यांनी पद सोडले. आश्चर्याची बाब म्हणजे कर्स्टन एकाही एकदिवसीय सामन्याचे प्रशिक्षक होऊ शकले नाहीत. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानच्या व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये संघाचे प्रशिक्षक असतील. गिलेस्पी हे पाकिस्तानच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकही आहेत.

पीसीबीने गॅरी कर्स्टन यांच्याकडून संघ निवडीचे अधिकार काढून घेतले होते. हा अधिकार फक्त निवड समितीकडे होता ज्याचा तो आता भाग नाही. यामुळे कर्स्टन संतप्त झाल्याचे बोलले जात आहे. रिझवानच्या नियुक्तीतही कर्स्टन यांचे मत घेतले गेले नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, कर्स्टन यांनी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केले नाही, मात्र अलीकडच्या घडामोडींमुळे ते निराश झाल्याचे समजते.

सध्याच्या निवड समितीच्या वाढत्या प्रभावामुळे गॅरी कर्स्टन यांना एकटेपणा जाणवत होता. इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी हरल्यानंतर पाकिस्तानने नवीन निवड समितीची घोषणा केली. तीन महिन्यांत तिसऱ्यांदा हा प्रकार घडला. आकिब जावेद, अलीम दार, अझहर अली, असद शफीक आणि हसन चीमा यांचा समावेश होता, तर प्रशिक्षक आणि कर्णधार यांना निवड समितीमधून काढून टाकण्यात आले होते.

हेही वाचा – भारतासाठी वरदान ठरणार रतन टाटांचं ड्रीम प्रोजेक्ट! पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ आणि नवा कर्णधार जाहीर करण्यास उशीर होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे बोर्डात सुरू असलेली चर्चा. कर्स्टन यांना त्यांच्या सूचनांचा विचार व्हावा अशी इच्छा होती. लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत नवीन कर्णधार मोहम्मद रिझवानची घोषणा करण्यात आली तेव्हा अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासह फक्त नवीन निवड समिती सदस्य आकिब जावेद आणि नवा कर्णधार रिझवान आणि उपकर्णधार सलमान आगा उपस्थित होते. कर्स्टन त्यावेळी देशातही नव्हते.

कर्स्टन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

डावखरे सलामीवीर गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी 101 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 45.27 च्या सरासरीने 7289 धावा केल्या. या कालावधीत त्यांची सर्वोच्च धावसंख्या 275 होती. आपल्या कसोटी कारकिर्दीत गॅरी यांनी 21 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली होती.

गॅरी कर्स्टन यांनी 185 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 6798 धावा केल्या, ज्यात 13 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. कर्स्टन यांचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 188 होती, जी त्यांनी 1999 च्या विश्वचषकात यूएई विरुद्ध केली होती.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment