एक ‘सोपा’ कॅच सोडणं म्हणजे काय असतं ते फक्त हर्शेल गिब्सला विचारा!

WhatsApp Group

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२१…पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची मॅच..आणि हसन अलीनं मॅथ्यू वेडचा सोडलेला कॅच. हा प्रसंग म्हणजे पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एखादी ओली जखमच. या घटनेनंतर हसन अलीला कशाकशाला सामोरं जावं लागलं असेल, याची कल्पनाच कोणी करू शकत नाही. कदाचित हसन अलीनं तो कॅच घेतला असता, तर पाकिस्तानचा फॉर्म पाहता वर्ल्डकपचं सुख त्यांनाच अनुभवता आलं असतं. पण तसं काही घडलं नाही.

हसन अलीसोबत घडलेला प्रकार प्रकार दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू हर्शेल गिब्सच्या बाबतीत घडला होता. या घटनेला २० वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी गिब्सला ही नकोशी आठवण आजही तेवढीच दुखणं देत असेल. गिब्सच्या या एका कॅचमुळं दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकप हुकला होता. १९९९ मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे वर्ल्डकपमधील तो किस्सा. एक महत्त्वाच्या सामन्यात आफ्रिकेच्या गिब्सनं घोडचूक केली आणि त्याचा फटका संघाला बसला.

गिब्सनं ठोकलं होतं शतक

गिब्स तसा बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये निपुण. त्याचं मैदानावरील धावणं म्हणजे चपळतेला चॅलेंज दिल्यासारखंच. पण त्यादिवशी काही वेगळंच घडलं. वर्ल्डकपच्या सुपर लीग सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्स, जॉन्टी ऱ्होड्स, हॅन्सी क्रोनि, लान्स क्लुसेनर, अॅलन डोनाल्ड, शॉन पोलॉक यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रबळ दावेदारांपैकी एक होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा केल्या. सलामीवीर गिब्सनं १०१ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचवेळी डॅरिल कुलिननने ५० धावांचं योगदान दिलं. ऱ्होड्सनं ३९ आणि लान्स क्लुसनरनं ३६ धावा केल्या.

स्टीव्ह वॉ ठरला हिरो…

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अॅडम गिलख्रिस्ट ५ धावा करून बोल्ड झाला, तर मार्क वॉ वैयक्तिक ५ धावांवर धावबाद झाला. डॅमियन मार्टिनही काही विशेष करू शकला नाही. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ३ विकेट ४८ धावांवर पडल्या. यानंतर रिकी पाँटिंग आणि कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी सूत्रं हाती घेतली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. वॉ ५६ धावांवर असताना गिब्सनं त्याचा सोपा कॅच सोडला. त्याचवेळी वॉ गिब्सला म्हणाला, ”मित्रा, तू कॅच नाही..वर्ल्डकप सोडला आहेस.” कॅच सुटल्यानंतर वॉनं शतक झळकावलं. त्यानं या सामन्यात ११० चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १२० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने हा सामना २ चेंडू आणि ५ गडी राखून जिंकला. वॉला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्ंयांदा विश्वविजेता बनला आणि दक्षिण आफ्रिका संघाकडं दु:ख करण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं.

Leave a comment