India U19 World Cup 2026 : भारतीय अंडर-19 संघाने क्रिकेट इतिहासात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत अंडर-19 विश्वचषक 2026 आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी दणदणीत पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, गेल्या पाच अंडर-19 विश्वचषकांपैकी तीन वेळा भारताने विजेतेपद मिळवले, हे भारतीय युवा क्रिकेटच्या बळकटीचे ठळक उदाहरण आहे.
🚨 ICC U19 World Cup 2026 🚨
— Sporcaster (@Sporcaster) February 6, 2026
Record Makers. Game Changers. World Champions. 🇮🇳🏆
India U19 conquer the world with a dominant win to lift their 6⃣th ICC U19 World Cup 🔥👏#U19WorldCup #INDvENG #INDU19vsENGU19pic.twitter.com/tRisYuMzsU
वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम
हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 50 षटकांत 9 गडी गमावत 411 धावांचा प्रचंड डोंगर उभारला. या ऐतिहासिक कामगिरीचा केंद्रबिंदू ठरला वैभव सूर्यवंशी. अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावा, त्यात 15 चौकार आणि 15 षटकार – हा डाव केवळ शानदार नव्हे, तर स्मरणात राहणारा होता. संपूर्ण स्पर्धेत वैभवने 7 सामन्यांत 439 धावा, त्यात 3 अर्धशतके आणि 1 शतक झळकावत स्वतःला या स्पर्धेचा नायक सिद्ध केले. त्याला सामनावीर आणि मालिकावीर या दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
इतर फलंदाजांची मोलाची साथ
कर्णधार आयुष म्हात्रे याने 53 धावांची जबाबदार खेळी केली, तर अभिज्ञान कुंडू याने 40 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जेम्स मिंटो याने 3 गडी बाद केले, तर सेबेस्टियन मॉर्गन आणि अॅलेक्स ग्रीन यांना प्रत्येकी 2 गडी मिळाले.
फॉल्कनरचे शतक निष्फळ
412 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 40.2 षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून कालेब फॉल्कनर याने 115 धावांची झुंजार शतकी खेळी केली, मात्र दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याचा संघर्ष व्यर्थ ठरला. भारताकडून आर. एस. अंबरीश याने 3 गडी बाद करत निर्णायक भूमिका बजावली, तर दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले.
दोन्ही संघांची अंतिम संघरचना
भारत
आयुष म्हात्रे (कर्णधार), आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
इंग्लंड
थॉमस रेव (कर्णधार), बेन डॉकिन्स, जोसेफ मॉरिस, बेन मेयस, कालेब फॉल्कनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबेस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा