IPL मधून बाहेर काढलं, ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न, रवींद्र जडेजाची 2010 मधील ‘ती’ गोष्ट!

WhatsApp Group

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेटचा “रॉकस्टार” म्हणून ओळखला जाणारा रवींद्र जडेजा पुन्हा एकदा आपल्या आयपीएल करिअरच्या ऐतिहासिक टप्प्यावर उभा आहे. चर्चेत असलेल्या माहितीनुसार, जडेजा 2026 च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामासाठी राजस्थान रॉयल्स (RR) संघात सामील होण्याची शक्यता आहे. या ट्रेड डीलनुसार संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडे (CSK) जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच, जडेजाचा आयपीएलमधील प्रवास जिथून सुरू झाला, तिथेच तो पुन्हा संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु, या “होमकमिंग”मध्ये एक काळी आठवण दडलेली आहे, कारण 2010 मध्ये जडेजाला राजस्थान रॉयल्सकडून एका वर्षासाठी आयपीएलमधून बंदी घालण्यात आली होती.

कशामुळे घातली होती जडेजावर बंदी?

2010 साली जडेजाने दुसऱ्या फ्रेंचायझीसोबत ट्रेडसाठी चर्चा केल्याचे वृत्त बाहेर आले होते. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, जडेजाने राजस्थान रॉयल्ससोबतचा दोन वर्षांचा करार मोडून इतर संघांशी करारासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्या काळात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या कृतीला खेळाडू नियमांचा भंग मानला आणि त्याच्यावर एका हंगामाची बंदी घातली.

तेव्हा तत्कालीन आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी एका निवेदनात सांगितले होते, “गव्हर्निंग काऊन्सिलने रवींद्र जडेजाच्या आणि राजस्थान रॉयल्सच्या सादरीकरणावर विचार करून हा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे नियम सर्व खेळाडूंना लागू आहेत आणि त्यांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. कुठलाही खेळाडू किंवा संघ ब्लॅकमेलिंग किंवा नियमभंग करेल, तर आम्ही त्याला सहन करणार नाही.”

ही घटना आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात एकमेव आहे, जिथे खेळाडूला ट्रेड चर्चेमुळे पूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती.

जडेजाचा प्रवास : राजस्थानपासून चेन्नईपर्यंत

2008 मध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आयपीएलचं पहिलं विजेतेपद पटकावलं आणि त्या यशात 19 वर्षीय जडेजाचा मोलाचा वाटा होता. वॉर्नने त्याला “रॉकस्टार” अशी उपाधी दिली होती. 2008 मध्ये जडेजाने 135 धावा केल्या, तर 2009 मध्ये 6 विकेट घेतल्या. परंतु 2011च्या मेगा ऑक्शनपूर्वी राजस्थानने त्याला रिटेन केलं नाही. त्यानंतर कोची टस्कर्स केरळा या संघाने त्याला विकत घेतलं.

फ्रेंचायझी बंद झाल्यावर जडेजा पुन्हा ऑक्शनमध्ये गेला आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याला विकत घेतलं. त्यानंतर तो CSK चा अविभाज्य भाग बनला.

2016–17 मध्ये CSK निलंबित झाल्यावर तो गुजरात लायन्स साठी खेळला. जडेजाने CSK साठी 2018, 2021 आणि 2023 मध्ये विजेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि 2022 मध्ये त्याने सात सामन्यांत कर्णधारपदही सांभाळले.

आता पुन्हा राजस्थानकडे?

जर हा ट्रेड डील खरा ठरला, तर रवींद्र जडेजा पुन्हा त्या संघाकडे जाणार आहे, ज्याने त्याला 17 वर्षांपूर्वी “रॉकस्टार” बनवलं होतं. त्याचा प्रवास पहिल्या आयपीएल विजयानंतर बंदी, आणि आता पुन्हा घरवापसी हा खरंच एक “फुल सर्कल” क्षण ठरेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment