Rohit Sharma On Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने 2023 आयसीसी वनडे वर्ल्डकप फायनलनंतर आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांचा अनुभव घेतल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या त्या पराभवानंतर आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा गंभीर विचार करत होतो, असे रोहितने स्पष्ट शब्दांत सांगितले.
गुरुग्राम येथे झालेल्या Masters’ Union कार्यक्रमात बोलताना रोहितने पहिल्यांदाच त्या मानसिक संघर्षाबद्दल उघडपणे भाष्य केले. “2023 वर्ल्डकप फायनलनंतर मी पूर्णपणे खचून गेलो होतो. मला वाटत होतं, आता क्रिकेट खेळायचंच नाही. या खेळाने माझ्याकडून सगळं घेतलं होतं आणि माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं,” असे भावूक शब्द रोहितने वापरले.
परिपूर्ण कामगिरी, पण अखेरचा धक्का
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 वर्ल्डकपमध्ये घरच्या मैदानावर सलग 9 सामने जिंकत फायनलपर्यंत मजल मारली होती. संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय वाटत होता. मात्र फायनलमध्ये ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने भारताच्या विजेतेपदाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. भारताने दिलेलं 240 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 षटकं शिल्लक ठेवून पूर्ण केलं.
हेही वाचा – रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी बातमी! 26 डिसेंबरपासून तिकीट दरात बदल, 500 किमीला ₹10 ने वाढ!
“तो काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता”
रोहितने स्पष्ट केलं की, तो ब्रेक फॉर्म किंवा फिटनेससाठी नव्हता, तर पूर्णपणे मानसिक थकव्यामुळे होता. “प्रत्येक जण निराश झाला होता. नेमकं काय घडलं, हे आम्हालाही कळत नव्हतं. पण माझ्यासाठी तो काळ फार कठीण होता, कारण 2022 पासून कर्णधारपद घेतल्यापासून मी या वर्ल्डकपसाठी सगळं पणाला लावलं होतं,” असे रोहित म्हणाला.
थोड्या काळासाठी क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर, हळूहळू आपण पुन्हा स्वतःला सावरल्याचंही त्याने सांगितलं. “हा खेळ मला खूप आवडतो, हे मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहिलो. इतक्या सहज ते सगळं सोडू शकत नव्हतो,” असेही तो म्हणाला.
वर्ल्डकपमधील रोहितची आकडेवारी
2023 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माची कामगिरी अत्यंत प्रभावी होती.
- 11 डावात 597 धावा
- सरासरी: 54.27
- स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज
(पहिला – विराट कोहली: 765 धावा)
फायनलमध्येही रोहितने 31 चेंडूत 47 धावा, 4 चौकार आणि 3 षटकार मारले होते.
अंतिम ध्येय – 2027 वनडे वर्ल्डकप
या पराभवानंतर रोहितच्या कारकिर्दीला मोठं वळण मिळालं. त्याने T20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तसेच यंदा त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आलं. तरीही रोहितने वनडे क्रिकेट सोडलेलं नाही. कारण एकच आहे – 2027 चा वनडे वर्ल्डकप. दरम्यान, 2024 मध्ये रोहितने भारताला T20 वर्ल्डकप विजेतेपद मिळवून दिलं. तरीही 2023 च्या पराभवाचं दुःख सहज विसरता आलं नाही, हे त्याने प्रामाणिकपणे मान्य केलं. “अपयशातून सावरायला वेळ लागतो. पण आयुष्य तिथेच थांबत नाही. तो माझ्यासाठी मोठा धडा होता,” असे शब्द रोहितने शेवटी वापरले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा