

IPL 2023 Arjun Tendulkar Debut : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल (IPL 2023) मध्ये पदार्पण केले आहे. IPL 2023 च्या 22 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स (MI) ने त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले. 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांचा संघात समावेश केला होता, परंतु 2021 आणि 2022 च्या सीझनमध्ये त्याला मुंबई IPL चा एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कोलकाता विरुद्ध रोहित शर्माचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती.
सचिनची प्रतिक्रिया!
या सामन्यात मुंबईने 5 विकेट्सने विजय मिळवला. अर्जुनने या सामन्यात 2 षटकात 17 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. अर्जुनच्या पदार्पणावर सचिनने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली. तो म्हणाला, ”अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझ्यावर आणि खेळावर उत्कट प्रेम करणारा तुझा वडील म्हणून सांगतो, की मला माहीत आहे की तू खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि खेळ तुला प्रेम परत देईल. तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तू ती करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट!”
हेही वाचा – IPL 2023 : डेब्यु मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरने काय केलं? किती धावा दिल्या?
You have worked very hard to reach here, and I am sure you will continue to do so. This is the start of a beautiful journey. All the best! 👍💙 (2/2)
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्या संघात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत समाविष्ट केले होते. आयपीएल 2022 मध्ये, त्याला 30 लाखांच्या मूळ किमतीवर संघात सामील करण्यात आले आणि नंतर आयपीएल 2023 मध्ये, त्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले. आयपीएल 2021 मध्ये, अर्जुनला दुसऱ्या सत्रात दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर राहावे लागले होते.
अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द
अर्जुन तेंडुलकरचा जन्म 24 सप्टेंबर 1999 रोजी मुंबईत झाला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुनने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. अर्जुन तेंडुलकरने 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 19 वर्षाखालील पदार्पण केले. त्याने 15 जानेवारी 2021 रोजी मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (2020-21) मध्ये हरयाणा विरुद्ध पहिला T20 सामना खेळला. अर्जुनने रणजी कारकिर्दीची सुरुवात मुंबईतून खेळून केली होती, मात्र यावर्षी त्याने मुंबई सोडून गोव्यातून खेळण्याचा निर्णय घेतला.
सचिन तेंडुलकरची आयपीएल कारकीर्द
सचिन तेंडुलकरला 2008 ते 2013 या कालावधीत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सचिनने आयपीएलच्या 6 हंगामात एकूण 78 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने सुमारे 120 च्या स्ट्राइक रेटने 2334 धावा केल्या. सचिन तेंडुलकरने देखील 2011 मध्ये आयपीएलचे एकमेव शतक झळकावले होते. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 13 अर्धशतकेही केली आहेत.