21 Year Old Boy Cancer Emotional Post : जगणं किती विचित्र आहे ना! काही लोकांकडे वेळ असतो, पण त्यांना त्याची किंमत कळत नाही… आणि काही जणांकडे वेळ उरतच नाही. आपण सगळेच असे जगतो की जणू आयुष्य आपल्या हातात आहे – हवं तेव्हा थांबेल, हवं तेव्हा पुढं जाईल. पण खरं सांगायचं तर आपण सगळे या रंगमंचावरच्या कठपुतळ्या आहोत… जसं ‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्ना म्हणाले होते – “कब, कौन, कैसे इस मंच से उठ जाएगा… कोई नहीं जानता!”
अशाच एका 21 वर्षांच्या मुलाने आपल्या शेवटच्या काही क्षणांमध्ये लिहिलेली Reddit पोस्ट आज इंटरनेटला भावनिक करून गेली. पोस्टचं शीर्षक होतं, “कॅन्सर जिंकला मित्रांनो, आता मी चाललो…”
“मी 21 वर्षांचा आहे…”
त्या पोस्टमध्ये त्या तरुणाने लिहिलं, “2023 मध्ये मला स्टेज 4 कोलोरेक्टल कॅन्सर झाल्याचं निदान झालं. तेव्हापासून कितीतरी वेळा केमोथेरपी झाली, अनेक रात्री हॉस्पिटलमध्ये गेल्या. आता डॉक्टरांनी सांगितलंय की काहीच उरलेलं नाही करण्यासारखं. कदाचित या वर्षाअखेरपर्यंत मी जिवंत राहणार नाही.”
त्याने पुढे लिहिलं, “दिवाळी जवळ आलीये, रस्त्यांवर दिव्यांची रोषणाई दिसतेय. मनात एकच विचार येतो, ही माझी शेवटची दिवाळी असेल कदाचित. लोकांचे हसरे चेहरे, आवाज, रोषणाई… सगळं मला आठवेल.”
“जग पुढे चाललंय… आणि मी मागे राहतोय”
त्या मुलाच्या प्रत्येक शब्दामध्ये एक हळवी जाणीव होती. “जग पुढे चाललंय… आणि मी मात्र हळूहळू मागे पडतोय. पुढच्या वर्षी कोणी तरी माझ्या घरात दिवे लावेल, पण मी फक्त आठवण बनून राहीन.”
तो पुढे म्हणतो, “कधी कधी रात्री अजूनही भविष्यासाठी विचार करतो… सवयच झालीये बहुतेक. थोडं फिरायचं होतं, काहीतरी स्वतःचं सुरू करायचं होतं, आणि तब्येत ठीक झाल्यावर एक कुत्रा दत्तक घ्यायचा होता. पण आता वेळ फारच कमी आहे. सगळे स्वप्नं धूसर होत चालली आहेत.”
हेही वाचा – घर खरेदी करताना सर्वात मोठी चूक कोणती होते, माहीत आहे का?
त्याच्या पोस्टमध्ये सर्वात हृदयद्रावक भाग होता, “मी आता घरी आहे… आणि रोज माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर ती शांत वेदना पाहतो. मला माहीत नाही मी हे लिहितोय का… पण कदाचित असं लिहिल्याने मन थोडं हलकं होतं. कदाचित मी जाण्यापूर्वी एखादा छोटासा ठसा मागे ठेवावा म्हणून…”
शेवटी त्याने लिहिलं, “बस इतकंच… आता चाललो… पाहतो, त्या पलीकडे काय आहे. See ya!!”
जगाला विचार करायला लावणारी पोस्ट
Reddit वरील ही पोस्ट r/TwentiesIndia या कम्युनिटीमध्ये टाकण्यात आली होती. काही तासांतच ती हजारोंच्या हृदयात पोहोचली. लोकांनी त्या अज्ञात मुलासाठी श्रद्धांजली वाहिली, काहींनी स्वतःच्या जीवनाचा अर्थ नव्याने शोधला. त्याचे हे काही शब्द सर्वांना आठवण करून देतात की आयुष्य खूप मौल्यवान आहे – ते वाया घालवण्याइतकं स्वस्त नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा