एका झटक्यात ४४ हजार कोटी कमावलेल्या BCCIनं कैफ-मिश्रासारख्या क्रिकेटपटूंना दिली ‘ही’ गूड न्यूज!

WhatsApp Group

मुंबई : भारत देश म्हटलं की क्रिकेट आलं आणि त्यासोबतच येतात ते या खेळाचे नायक. प्रत्येक दशकात असा कोणीतरी होऊन जातो, तो या खेळाची ब्रँड व्हल्यू वाढवतो. नव्या जनरेशनला जुना क्रिकेटर म्हणून कपिल देव आठवत असेल, याच काळात सुनील गावसकर स्टार होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं राज्य केलं. सचिनसोबत दादा, लक्ष्मण, सेहवाग आले. काळ पुढं सकरल्यानंतर झटपट खेळाचे बादशाह म्हणून युवराज, धोनी फेमस झाले. अशात टी-२० लीगची नांदी झाली. ललित मोदीच्या आयपीएल संकल्पनेनं सर्वांना वेडं केलं. ज्या गोष्टीत पैसा लागतो, ती इंडस्ट्री बनते. क्रिकेटला इंडस्ट्री म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आता आपण क्रिकेटच्या पटलावर वाट्टेल त्या पद्धतीनं राज्य करतोय. आयपीएलचा पहिला हंगाम आणि आत्ताचं चित्र कमालीचं बदललंय. धनाचं प्रमाण इतकं वाढलं, की क्रिकेटच्या विकासकामात नवनव्या गोष्टी करता येणं शक्य झालं.

२०२३ ते २०२७ अशा कालावधीसाठी आयपीएल या महाटी-२० लीगच्या मीडिया हक्कांचा लिलाव झाला. यात टीव्ही आणि डिजिटल अशा दोन गोष्टींसाठी ४४,०७५ कोटी पैसे बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मिळतील. आयपीएलची एक मॅच १०० कोटींच्या वर गेलीय. अमेरिकेची बास्केटबॉल लीग आणि इंग्लिश प्रीमियर लीग काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या कमाईवरून चेष्टा मस्करी करायचे, जसं आपण आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीगबाबत (पीएसएल) करतो. पण मीडिया हक्कांच्या ‘विक्रमी’ लिलावानंतर आयपीएल जगातील सर्वात दुसरी महागडी स्पर्धा ठरली. ही अतिआनंदाची बातमी समोर आल्यानंतर बीसीसीआयनं कल्याणकारी निर्णय घेत सर्वांना गूड न्यूज दिली.

पेन्शन वाढलं गड्या!

देशाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा करत बीसीसीआयनं ही गूड न्यू दिली. या घोषणेमुळं पेन्शनचा लाभास पात्र ठरणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आनंदाची लाट उसळलीय. २००३ पूर्वी प्रथम श्रेणीतून निवृत्त झालेल्या, ५०-७४ सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना पूर्वी १५,००० रुपये मिळायचे. मात्र आता त्यांना सुधारित पेन्शन अंतर्गत ३०,००० रुपये मिळणार आहेत. जे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ७५ किंवा त्याहून अधिक सामने खेळले आणि २००३ पूर्वी निवृत्ती घेतली, त्यांच्या पेन्शनची रक्कम २२,५०० वरून ४५,००० हजार रुपये करण्यात आलीय.

२०१५ मध्ये, बीसीसीआयने म्हटलं होतं, की ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी निवृत्ती घेतलेल्या आणि २५ पेक्षा जास्त सामने खेळलेल्या सर्व कसोटी क्रिकेटपटूंना दरमहा ५०,००० दिले जातील. परंतु नवीन धोरणानुसार आता ही रक्कम ७०,००० रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. त्याच वेळी २५ पेक्षा कमी कसोटी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ३७,५०० रुपये मिळत होते, ते आता ६०,००० रुपये झाले आहेत. ज्या महिला क्रिकेटपटूंनी ५-९ कसोटी सामने खेळले, त्यांच्या पेन्शनची रक्कम आता १५,००० रुपयांवरून ३०,००० रुपये झाली आहे. १० किंवा त्याहून अधिक कसोटी खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंना आता २२,५०० ऐवजी ४५,००० रुपये मानधन मिळेल.

बीसीसीआयच्या या निर्णयामुळं मोहम्मद कैफ, अमित मिश्रा यांसारखे क्रिकेटपटूं सुखावलेत. पैसा तुम्हाला सुरक्षितता देतो आणि ओखळ तुम्हाला अभिमान देते, असं म्हणत कैफनं आपल्या बोर्डाला धन्यवाद म्हटलंय.

Leave a comment