Sunil Gavaskar On Messi : फुटबॉल जगतात देवासमान मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीवर आता भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर थेट निशाणा साधला आहे यांनी. कोलकाता येथे झालेल्या ‘GOAT Tour’ कार्यक्रमातील गोंधळावर बोलताना गावसकर यांनी मेस्सीला थेट “खरा दोषी” ठरवले आहे.
13 डिसेंबर रोजी मेस्सी, लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल हे तिन्ही स्टार खेळाडू कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर पोहोचले होते. आयोजकांनी हा कार्यक्रम तब्बल दोन तासांचा असल्याचा दावा केला होता. हजारो चाहते तिकीट काढून आपल्या फुटबॉल हिरोची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जमले होते. मात्र अपेक्षेच्या पूर्णपणे उलट, हा कार्यक्रम अचानक आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता थांबवण्यात आला.
यामुळे प्रचंड संताप उसळला. स्टेडियमबाहेर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या, परिस्थिती हिंसक बनली आणि अखेर कोलकाता पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक सतद्रु दत्ता यांना अटक केली. काही राजकीय नेते, व्हीआयपी आणि सुरक्षा व्यवस्थेवर आरोप झाले. मात्र सुनील गावसकर यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत थेट मेस्सीवर बोट ठेवले आहे.
हेही वाचा – वर्ल्डकप विजेता कॅप्टन अर्जुन रणतुंगावर अटकेची टांगती तलवार!
Sportstar मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात गावसकर म्हणतात, “ज्याने आपली जबाबदारी पार पाडली नाही, त्याच्यावर आरोप झाला नाही. उलट बाकी सर्वांना दोष देण्यात आला.” गावसकर पुढे स्पष्ट करतात की, करार नेमका काय होता हे जाहीर झालेले नसले तरी, जर मेस्सीने ठरलेल्या वेळेआधीच कार्यक्रम अर्धवट सोडला असेल, तर जबाबदारी त्याची आणि त्याच्या टीमचीच ठरते. “जर तो एक तास उपस्थित राहणार होता आणि त्याआधीच निघून गेला, तर खरा दोषी तो आणि त्याचा टीमचा आहे,” असे परखड मत गावसकरांनी मांडले.
सुरक्षेच्या कारणावरून कार्यक्रम थांबवण्यात आल्याच्या दाव्यालाही गावसकरांनी नकार दिला. त्यांच्या मते, मेस्सीला किंवा त्याच्या सहकाऱ्यांना कोणताही गंभीर धोका नव्हता. “हो, त्याच्या भोवती राजकीय नेते आणि तथाकथित व्हीआयपी होते. पण कोणताही सुरक्षेचा धोका नव्हता,” असे त्यांनी नमूद केले.
गावसकर यांनी एक साधा उपायही सुचवला. “मेस्सीने मैदानावर एक फेरी मारली असती किंवा फक्त एक पेनल्टी किक घेतली असती, तरी गर्दीला समाधान मिळाले असते. त्यासाठी आजूबाजूचे लोक आपोआप बाजूला झाले असते.”
75 वर्षीय गावसकर यांनी आयोजकांची बाजू घेताना हेही स्पष्ट केले की, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या मेस्सीच्या इतर कार्यक्रमांमध्ये कोणताही गोंधळ झाला नव्हता. “इतर ठिकाणी कार्यक्रम सुरळीत झाले, कारण तिथे वचन पाळले गेले. त्यामुळे कोलकात्यातील भारतीयांवर दोष ठेवण्याआधी, दोन्ही बाजूंनी करार पाळला गेला का हे तपासणे गरजेचे आहे,” असा ठाम निष्कर्ष त्यांनी काढला.
या वक्तव्यांनंतर फुटबॉल आणि क्रिकेट विश्वात नवी चर्चा सुरू झाली असून, ‘GOAT कोण?’ हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा