Hyderabad Student School Bullying : हैदराबादमधील चंदा नगर परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चौथी इयत्तेत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या प्रशांत या चिमुकल्याने सहपाठी विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या छळाला (Bullying) कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने शाळांमधील वाढत्या या प्रकारांवर आणि लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
युनिफॉर्म नीट न घातल्यामुळे सुरू होता छळ
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, प्रशांतला त्याच्या वर्गातील काही सहपाठी सतत टोमणे मारत होते. विशेषतः तो शाळेची युनिफॉर्म नीट घालत नाही, या कारणावरून त्याची थट्टा आणि चिडवाचिडवी केली जात होती. या सततच्या मानसिक दबावामुळे प्रशांत प्रचंड तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
घरी आल्यानंतर थेट वॉशरूममध्ये गेला
मंगळवारी सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर प्रशांतने ना कपडे बदलले, ना दप्तर बाजूला ठेवले. तो थेट घरातील वॉशरूममध्ये गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा तोडून आत गेल्यावर प्रशांत शाळेच्या ID कार्डच्या दोरीने (Lanyard) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू, शिक्षक-विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत
घटनेची माहिती मिळताच चंदा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रशांतचे पार्थिव मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.सध्या पोलिसांकडून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासनाचे जबाब नोंदवले जात असून, छळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा – दादरला थांबली पण दरवाजेच उघडले नाहीत! AC लोकलचा प्रकार, काय घडलं?
शाळांमध्ये ‘अँटी-बुलिंग’ कायदे काय सांगतात?
पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, शाळांमध्ये बुलिंगविरोधात कठोर कायदेशीर तरतुदी अस्तित्वात आहेत. बुलिंगमध्ये दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबन (Suspension), दुसऱ्या शाळेत सक्तीने बदली (Transfer), तसेच अनिवार्य मानसोपचार समुपदेशन (Psychological Counselling) दिले जाऊ शकते. वयानुसार कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे.
2022 मध्येही अशीच घटना घडली होती
ही घटना हैदराबादसाठी पहिली नाही. 2022 मध्येही गृहपाठाच्या दबावामुळे एका लहान मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर बालहक्क कार्यकर्त्यांनी शाळांमध्ये मजबूत मानसिक आरोग्य सहाय्य प्रणाली (Robust Mental Health Support System) राबवण्याची जोरदार मागणी केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा