17 वर्षाच्या आदित्यने बनवली AI रोबो टीचर, सर्वत्र चर्चेचा विषय, शिक्षक नसले की शिकवणार!

WhatsApp Group

AI Teacher Robot Sophie : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे केवळ 17 वर्षांच्या आदित्य कुमार नावाच्या विद्यार्थ्यानं अशी कामगिरी केली आहे की संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्याच्याकडे वळले आहे. आदित्यनं एक AI टीचर रोबोट तयार केला असून त्याचं नाव दिलं आहे ‘सोफी’ (AI Teacher Robot Sophie). हा रोबोट विद्यार्थ्यांना स्वतः बोलून शिकवतो, त्यांचे प्रश्न समजून घेतो आणि तात्काळ उत्तरही देतो. शालेय शिक्षणातील तंत्रज्ञानाला नवी दिशा देणारी ही कल्पना आता चर्चेचा विषय ठरली आहे.

LLM चिपसेटने बनलेला अत्याधुनिक रोबोट

या रोबोटमध्ये LLM चिपसेट (Large Language Model Chipset) चा वापर करण्यात आला आहे. ही तीच तंत्रज्ञान-आधारित चिप आहे, जी मोठ्या AI कंपन्यांमध्ये रोबोटिक सिस्टम्स तयार करण्यासाठी वापरली जाते. यामुळे सोफीला भाषा समजणे, बोलणे आणि माहिती प्रक्रिया करणे शक्य होते. जेव्हा सोफीला स्वतःचा परिचय सांगण्यास सांगितले गेले, तेव्हा तिनं अगदी सहजपणे उत्तर दिलं, “मी AI टीचर रोबोट सोफी आहे. मला आदित्यनं तयार केलं आहे. मी बुलंदशहरच्या शिवचरण इंटर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवते आणि त्यांचे प्रश्न सोडवते.”

विद्यार्थ्यांसाठी बनवलेला रोबोट

आदित्य सध्या 12वीचा विद्यार्थी आहे. त्याचं म्हणणं आहे की, “मी हा रोबोट विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून तयार केला आहे. तिला विद्यार्थ्यांच्या शंका दूर करता येतात. सध्या ती फक्त बोलते, पण पुढील आवृत्तीत ती स्वतः लिहूही शकेल.”

आदित्यचं मत असंही आहे की, एखाद्या दिवशी शिक्षक शाळेत उपलब्ध नसतील, तर हा रोबोट त्यांच्या जागी वर्ग घेऊ शकतो. सध्या सोफी फक्त हिंदी भाषेत संवाद साधते, पण भविष्यात तिला इतर भाषा शिकवण्याचाही त्याचा प्लॅन आहे.

हेही वाचा – 3 फुट उंची आणि जवळपास 20 किलो वजन…गुजरातच्या गणेशला उंचीवरून प्रवेश नाकारला, न्यायालयात लढा देत बनला डॉक्टर!

सोफीची योग्य उत्तरे पाहून सर्व थक्क

आदित्यनं सोफीची क्षमता थेट प्रात्यक्षिकातून दाखवली. तिनं जगातील सर्वात उंच इमारत, भारताचे पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान अशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. इतकंच नाही, तर “वीज म्हणजे काय?” यासारख्या विज्ञानातील प्रश्नांनाही तिनं योग्य प्रतिसाद दिला. “100 + 92” विचारल्यावर तिनं क्षणात बरोबर उत्तर सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात ‘स्टुडंट रिसर्च लॅब’ची मागणी

आदित्यचं म्हणणं आहे की, “देशातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी अशी लॅब असावी, जिथे ते स्वतः संशोधन करू शकतील, प्रयोग करू शकतील आणि नव्या तंत्रज्ञानाच्या कल्पनांना मूर्त रूप देऊ शकतील.”

बुलंदशहरातील या मुलानं तंत्रज्ञानाचा वापर करून शाळांमध्ये इनोवेशन कसं वाढवता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण ठेवलं आहे. शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यातही या रोबोटविषयी उत्सुकता वाढली असून, भविष्यात अशा रोबोट्समुळे शिक्षणात मोठे बदल संभवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment