3 फुट उंची आणि जवळपास 20 किलो वजन…गुजरातच्या गणेशला उंचीवरून प्रवेश नाकारला, न्यायालयात लढा देत बनला डॉक्टर!

WhatsApp Group

3 Feet Doctor Ganesh Baraiya : गुजरातमधील गणेश बरैया हे नाव आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या 3 फुट उंचीच्या आणि जवळपास 20 किलो वजनाच्या जन्मजात बटू (Dwarfism) या स्थितीने ग्रस्त असलेल्या या युवकाने आपल्या मर्यादांवर मात करत ‘डॉक्टर’ होण्याचे मोठे स्वप्न पूर्ण केले. त्याला 72 टक्के चालण्यासंबंधी अपंगत्व (Locomotor Disability) असूनही त्याने न्यायालयीन लढ्यातून स्वतःचे हक्क मिळवले आणि समाजासाठी सेवा करण्याचा मार्ग खुला केला.

2018 मध्ये MCI ने प्रवेश नाकारला

2018 मध्ये गणेश बरैयाने MBBS अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. मात्र Medical Council of India (MCI) ने त्याला केवळ त्यांच्या उंचीवरून प्रवेश देण्यास नकार दिला. संस्थेचे म्हणणे होते की, शारीरिक मर्यादा त्याच्या डॉक्टर म्हणून काम करण्याच्या क्षमतेत अडथळा ठरू शकतात. परंतु, गणेशचे स्वप्न तुटले नाही.

हायकोर्टात लढा – नंतर सुप्रीम कोर्टात विजय

भावनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा मुलगा, नीलकंठ विद्यापीठ, तालाजाचा विद्यार्थी, आर्थिक अडचण असूनही न्यायासाठी उभा राहिला. त्याच्या शाळेचे प्राचार्य डॉ. दलपतभाई कटारिया यांनी संपूर्ण न्यायालयीन खर्च उचलत गणेशला आधार दिला.

  • गुजरात हायकोर्टाने सुरुवातीला MCI चा निर्णय कायम ठेवला.
  • पण गणेश माघार न घेता थेट सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचला.

सुप्रीम कोर्टाने केवळ चार महिन्यांत ऐतिहासिक निकाल देत स्पष्ट केले की, “उंचीच्या आधारावर कोणालाही डॉक्टर शिक्षणाचा हक नाकारला जाऊ शकत नाही.” या निर्णयानंतर गणेश बरैयाचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागले.

शिक्षण पूर्ण करून आज ग्रामीण रुग्णांची सेवा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गणेशला भवनगर मेडिकल कॉलेजमध्ये 2019 मध्ये प्रवेश मिळाला. त्याने पूर्ण मनोभावे शिक्षण घेतले आणि राज्य सरकारने अनिवार्य केलेली इंटर्नशिपही पूर्ण केली.

गणेश म्हणतो,  “ग्रामीण भागात सर्वाधिक गरज आहे. गरीब लोकांना योग्य उपचार मिळावेत म्हणून मी डॉक्टर झालो आहे.” त्याच्या उंचीमुळे सुरुवातीला अनेक रुग्ण आश्चर्यचकित होतात. परंतु काही वेळातच गणेशला पूर्ण विश्वासाने स्वीकारतात.

गणेश हसत सांगतो, “लोक मला पाहून प्रथम थोडे दचकतात, पण नंतर ते सकारात्मकतेने वागतात आणि समाधानी होतात.” त्याचा आत्मविश्वास, चिकाटी आणि लोकसेवा करण्याची जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment