Sanjay Raut Shares Video On Dadar Protest : दादर परिसरात विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निर्माण झालेला तणाव आता अधिकच चिघळला आहे. आंदोलनादरम्यान एका महिलेने घटनास्थळी उपस्थित पोलिसांना थेट जाब विचारत खडसावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “जय महाराष्ट्र, मुली! शोभतेस महाराष्ट्र कन्या! हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल!” अशा कडक शब्दांत राऊतांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
नेमके काय घडले व्हिडिओमध्ये?
दादर येथे एक महिला त्याच्या मुलासोबत फक्त उभी होती, तेव्हा पोलिसांनी तिला तिथून दूर जाण्यास सांगितले, संतापलेल्या महिलेने पोलिसांना अभिव्यक्ती आणि कसली लोकशाही म्हणत सरकारचे वाभाडे काढले. संरक्षण द्यायचंय तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पोलिसांपासून द्या, असं तिने आक्रमकपण म्हटले. एकाने तिथे इन्कलाब झिंदाबादची घोषणा देत, त्या मुलाच्या वडिलांना पोलिसांनी पकडून दूर नेले. सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.
महिलेचा हा तडफदार अवतार आणि पोलिसांसोबत झालेली बाचाबाची कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या तरुणीच्या धाडसाचे मोठे कौतुक केले जात आहे.
संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांवर निशाणा
हा व्हिडिओ शेअर करत खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि थेट पंतप्रधान कार्यालयाला (PMO) टॅग केले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्रातील तरुण पिढीचा हाच संताप आगामी काळात या भ्रष्ट सत्तेचा अंत करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे आणि त्यानंतर पोलिसांच्या झालेल्या कारवाईमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला असून, सत्ताधारी पक्ष पोलिसांचा ढाल म्हणून वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा