नांदेडच्या ‘या’ कुटुंबाने नक्की असं काय केलं, ज्यामुळे पंतप्रधान मोदींना ‘मन की बात’मध्ये नोंद घ्यावी लागली?

WhatsApp Group

Nanded Pethkar Family Mann Ki Baat PM Modi : लग्नसराई म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते रोषणाई, डीजे, फटाके आणि जेवणावर होणारा लाखो रुपयांचा अवाढव्य खर्च! पण महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबाने या जुन्या परंपरेला छेद देत समाजसेवेचा एक असा आदर्श घालून दिला आहे, ज्याची दखल थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावातील पेठकर कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नात चक्क गावातील ३,५०० लोकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्यांच्या या अनोख्या आणि कौतुकास्पद उपक्रमाचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’च्या १३५ व्या भागात अत्यंत अभिमानाने केला आहे.

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?

‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेठकर कुटुंबाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “नांदेड जिल्ह्यातील बहादरपुरा गावात राहणाऱ्या पेठकर कुटुंबाने त्यांच्या घरातील लग्नाच्या आनंदात एक अतिशय भावनिक आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. कठीण काळात कुटुंबाला आधार मिळेल, असं काहीतरी आपण समाजाला दिलं पाहिजे, असं या कुटुंबाला वाटलं. म्हणूनच त्यांनी लग्नाच्या निमित्ताने गावातील सुमारे ३,५०० नागरिकांचा अपघात विमा उतरवला. प्रत्येक व्यक्तीला १ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमामागील त्यांची भावना खरोखरच मन स्पर्शून जाणारी आहे. हे कुटुंब समाजासाठी एक मोठी प्रेरणा बनले आहे.”

गावकऱ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’ का निवडलं?

बहादरपुरा गावाची लोकसंख्या साधारण ३,६०० च्या आसपास आहे, ज्यामध्ये बहुतांश लोक हे शेतकरी आणि मजूर आहेत. शेतात काम करताना अनेकदा साप चावणे, जंगली जनावरांचे हल्ले, नैसर्गिक आपत्ती किंवा रस्ते अपघात अशा दुर्घटना घडतात. अनेकदा गरिबीमुळे किंवा पैशांअभावी गावकऱ्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात.

हीच अडचण ओळखून, नवरदेव सिद्धेश्वर पेठकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विचार केला की, लग्नात वायफळ खर्च करण्यापेक्षा गावातील लोकांच्या आयुष्याला सुरक्षा देणे जास्त गरजेचे आहे. त्यानुसार त्यांनी गावातील मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा १ लाख रुपयांचा अपघात विमा स्वतःच्या खर्चाने उतरवला आणि तो गावकऱ्यांना लग्नाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिला.

नवरीबाईचं देशातील तरुणांना आवाहन

या कौतुकानंतर नवरी मंजुषा सिद्धेश्वर पेठकर हिने अत्यंत आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “आमच्या लग्नात माझ्या सासरच्या लोकांनी गावकऱ्यांना विम्याची पॉलिसी रिटर्न गिफ्ट म्हणून दिली, ही बातमी थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचली, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. माझी आता लग्न करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींना एकच विनंती आहे की, लग्नात वारेमाप आणि फालतू खर्च करण्यापेक्षा तो पैसा वाचवून समाजासाठी काहीतरी चांगलं काम करा, ज्याचा फायदा गरजू लोकांना होईल.”

नवरदेवाचे मोठे भाऊ अनुप पेठकर यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी गावात हेल्मेट वाटप आणि इन्शुरन्स कॅम्पचे आयोजन केले होते, ज्यामध्ये एकाच दिवसात ९०० गावकऱ्यांचा विमा उतरवण्यात आला होता.

नांदेडच्या पेठकर कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे आज संपूर्ण बहादरपुरा गाव सुरक्षित झाले असून, त्यांच्या या ‘डिजिटल आणि सोशल’ विचाराला अख्खा देश सॅल्युट करत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment