मुंबईत ट्रॅफिक पोलिसांचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद! पुरावा दाखवताच हवा गुल, नेटकऱ्यांनी केलं ‘फेमस’

WhatsApp Group

Mumbai Traffic Police Bribe Viral Video : नेहमीच सतर्कता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लावणारी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील ‘धुंद्रवाडी चेक पोस्ट’ (Dhundrawdi Check Post) येथे एका ट्रॅफिक पोलिसाने प्रवाशाकडे चक्क २,००० रुपयांची लाच मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संबंधित प्रवाशाकडे पासपोर्ट, व्हिसा आणि ड्युटी फ्री खरेदीचे अधिकृत बिल असतानाही त्याला अडवून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा संपूर्ण प्रकार प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने धमकी दिल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं? ‘ऑन-कॅमेरा’ पोलखोल!

सोशल मीडियावर ‘मुंबई पोलीस’ यांना टॅग करत युझरने हा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. महेंद्र कुमार  नावाच्या पीडित प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवासावरून कायदेशीर कागदपत्रांसह परतत होता. धुंद्रवाडी चेक पोस्टवर तैनात असलेल्या एका ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने त्याची गाडी अडवली. प्रवाशाने त्याचे ओरिजिनल पासपोर्ट, व्हिसा आणि विमानतळावरील ड्युटी फ्रीचे अधिकृत बिल दाखवले.

सर्व कागदपत्रे कायदेशीर आणि योग्य असतानाही, या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने प्रवाशाकडे २,००० रुपयांची लाच मागितली, असे या व्हिडिओत प्रवाशाने सांगितले. प्रवाशाने तात्काळ आपला मोबाईल काढून या संपूर्ण संभाषणाचे आणि लाचखोरीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले.

व्हिडिओ पुरावा पाहताच घाबरला पोलीस

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये प्रवाशाने लिहिले आहे की, “हा गृहस्थ माझ्याकडून २,००० रुपयांची लाच घेणारच होता, परंतु जेव्हा मी त्याला माझ्या मोबाईलमधील संपूर्ण व्हिडिओ पुरावा दाखवला, तेव्हा त्याचे धाबे दणाणले. पुरावा पाहताच त्याने मला तातडीने सोडून दिले आणि तिथून जाण्यास सांगितले.”

परंतु, हे प्रकरण इथेच थांबले नाही. रेकॉर्डिंग होत असल्याचे पाहून संबंधित ट्रॅफिक पोलिसाने प्रवाशाला धमकावण्यास सुरुवात केली आणि मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट कर, अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली. प्रवाशाने पोलिसाच्या या धमकीला न जुमानता तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.

सोशल मीडियावर संतापाची लाट; कारवाईची मागणी

हा व्हिडिओ ट्विटर (X) आणि फेसबुकवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, काही तासांतच याला हजारो व्ह्यूज आणि शेअर्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलला टॅग करून या भ्रष्ट पोलिसावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment