Delhi Cloud Seeding Failure : ‘लगान’ या चित्रपटाच्या शेवटी पडणारा पाऊस म्हणजे आशेचं आणि विजयाचं प्रतीक होतं. अगदी तसंच काहीसं दिल्लीकरांना वाटलं होतं, “ढगांवर पाऊस पाडून प्रदूषणावर विजय मिळवूया!” पण हा ‘क्लाउड सीडिंग’चा प्रयोग मात्र पूर्णपणे फसला. आकाशात विमान फिरलं, ‘सिल्व्हर आयोडाईड’चे कण उधळले गेले, पण जमिनीवर एक थेंबही पडला नाही. आणि राजधानीचं विषारी हवेचं आवरण कायमच राहिलं.
प्रदूषणावर कृत्रिम पावसाचा प्रयोग
दरवर्षी हिवाळ्याच्या महिन्यांत दिल्ली गॅसचेंबर बनते. थंड हवामान आणि कमी वाऱ्याचा वेग यामुळे प्रदूषण जमिनीवरच अडकून राहतं. अशा वेळी सरकारकडून ‘क्लाउड सीडिंग’ म्हणजेच कृत्रिम पावसाचा पर्याय पुढे आणला जातो. विचार असा, कृत्रिम पाऊस झाला, तर हवेतील प्रदूषक घटक खाली धुवून जातील. पण हा परिणाम तात्पुरता असतो.
या वर्षी दिल्लीतील नव्या भाजप सरकारने पुन्हा एकदा हा प्रयोग हाती घेतला. IIT कानपूरच्या तज्ज्ञांसोबत मिळून पाच ‘क्लाउड सीडिंग’ ट्रायल्सची योजना आखण्यात आली होती. यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला. 400 किलोमीटर उड्डाण करून IIT कानपूरचं विमान बुरारी, मयूर विहार आणि करोल बाग परिसरात ढगांवर ‘सिल्व्हर आयोडाईड’चे कण फवारण्यात आले. तीन तासांनी पुन्हा एकदा हेच काम करण्यात आलं.
Delhites waiting desperately for rain post Diwali.
— Avishek Goyal (@AG_knocks) October 28, 2025
Were set to witness showers as trial for cloud seeding was ongoing.
Media lauded the technology a success but its been 9 hours since the trial & still no rain😭
Money wasted 🙄 ? @gupta_rekha ?pic.twitter.com/YKqbTGne1K
ढग होते… पण पाऊस का नाही झाला?
‘सिल्व्हर आयोडाईड’ हा बर्फासारखा कण असतो, ज्याभोवती पाण्याचे थेंब तयार होतात. हे थेंब पुरेसे जड झाले, की पाऊस पडतो. पण त्यासाठी वातावरणात योग्य आर्द्रता (moisture) आवश्यक असते. IIT कानपूरच्या अहवालानुसार, त्या दिवशी ढगांमध्ये फक्त 10 ते 15 टक्के आर्द्रता होती. पावसासाठी किमान 50-60 टक्के आर्द्रता हवी असते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता जवळजवळ शून्यच होती.
IMD ने त्या दिवशी हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली होती, म्हणूनच हा प्रयोग करण्यात आला. पण प्रत्यक्षात आकाश जरी ढगाळ असलं, तरी योग्य ‘रेन-बेअरिंग’ ढग नव्हते. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे संशोधक डॉ. अक्षय देओरास यांनी सांगितलं, “फक्त ढग दिसले म्हणजे ते पावसासाठी योग्य असतातच असं नाही. योग्य ढग केवळ ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’दरम्यान तयार होतात. त्या दिवशी तसं वातावरण नव्हतं.” अशा परिस्थितीत हा प्रयोग यशस्वी होणं जवळजवळ अशक्य होतं. आणि तरीही सुमारे ₹1 लाख प्रति चौरस किलोमीटर एवढा खर्च करून तो करण्यात आला.
कृत्रिम पावसाने खरंच मदत होते का?
पर्यावरणतज्ज्ञ मात्र या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कृत्रिम पावसाने प्रदूषण काही तासांसाठी कमी होतं, पण एक-दोन दिवसांत हवेची गुणवत्ता पुन्हा पूर्ववत होते. म्हणजेच, हा ‘तात्पुरता उपाय’ आहे, कायमस्वरूपी नाही.
हेही वाचा – जगातलं पहिलं ‘आकाशात लटकणारं’ स्टेडियम! पृथ्वीवर पहिल्यांदाच असं काही घडणार
भारताने 1950 च्या दशकापासून ‘क्लाउड सीडिंग’चे प्रयोग केले आहेत. मुख्यतः दुष्काळी भागात पाऊस वाढवण्यासाठी. पण शहरी प्रदूषणाशी लढण्यासाठी ही पद्धत फारशी प्रभावी ठरलेली नाही.
मुंबईचं उदाहरणही असंच
2009 मध्ये मुंबई महापालिकेने ‘तानसा’ आणि ‘मोडक सागर’ जलाशय क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. त्यासाठी तब्बल ₹25 कोटी खर्च करण्यात आला. पण चार वेळा प्रयत्न करूनही फक्त थोडंशी रिमझिम झाली. 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा हा प्रस्ताव मांडला, पण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीने बोली लावली नाही आणि प्रकल्प थंड राहिला.
आंध्र प्रदेशात 2008 ते 2011 दरम्यानही असे प्रयोग झाले, पण अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. उलट या विषयावर राजकीय वादंग निर्माण झाला.
प्रदूषणावर ‘पावसाची’ नव्हे, दीर्घकालीन उपायांची गरज
दिल्लीतील या अपयशी प्रयोगाने एक गोष्ट स्पष्ट झाली. ढगांवर कोट्यवधी उधळूनही आभाळातून न्याय मिळत नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग हा केवळ तात्पुरता उपाय आहे. प्रदूषणावर मात करायची असेल, तर सरकारने वाहतूक, उद्योग, बांधकाम धूळ नियंत्रण आणि हरित क्षेत्र वाढवण्यासारखे दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा