Mumbai Family Death Watermelon : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. शनिवारी रात्री सोनेपूर्वी या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते, त्यानंतर काही तासांतच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. ही घटना अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) घडली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
पायधुनी येथील ‘मुगल बिल्डिंग’मध्ये राहणारे अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), त्यांच्या पत्नी नसीम (वय ३५) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (वय १६) व जैनब (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी, २६ एप्रिल रोजी या सर्वांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अब्दुल्ला यांचा अंधेरीमध्ये मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अब्दुल्ला यांच्या घरी पाच नातेवाईक जेवणासाठी आले होते. रात्री १०:३० च्या सुमारास या ९ जणांनी एकत्र जेवण केले. जेवणानंतर सर्व पाहुणे आपल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री साधारण १ ते १:३० च्या सुमारास डोकाडिया कुटुंबातील चौघांनी घरात असलेले कलिंगड कापून खाल्ले.
हेही वाचा – लक्षद्वीप ट्रिपचा प्लॅन करताय? आधी स्काईहॉपच्या ‘या’ नवीन सीप्लेन सेवेबद्दल जाणून घ्या
काही तासांतच प्रकृती खालावली
रविवार सकाळी ५:३० ते ६ च्या सुमारास कुटुंबातील चौघांनाही उलट्या आणि जुलाब होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांनी उपचार केले, मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान सकाळी १०:१५ च्या सुमारास धाकटी मुलगी आयशा हिचा मृत्यू झाला. त्यानंतर काही अंतराने नसीम आणि मोठी मुलगी जैनब यांचाही मृत्यू झाला. कुटुंबाचे प्रमुख अब्दुल्ला यांनी रात्री १०:३० वाजता अखेरचा श्वास घेतला.
पाहुणे सुखरूप, कलिंगडावर संशय
या प्रकरणी पोलीस उपायुक्त (झोन १) प्रवीण मुंधे यांनी माहिती दिली की, रात्री जेवणासाठी आलेल्या पाच पाहुण्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. पाहुणे गेल्यानंतर केवळ घरातील चौघांनीच कलिंगड खाल्ले होते. त्यामुळे विषबाधेचा केंद्रबिंदू हे कलिंगड असण्याची दाट शक्यता आहे.
जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रईस शेख यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी अब्दुल्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यांनी झोपण्यापूर्वी कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
फॉरेन्सिक तपासणी सुरू
पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरातील रात्रीचे उरलेले अन्न आणि कलिंगडाचे उरलेले तुकडे जप्त केले आहेत. हे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) पाठवण्यात आले आहेत. अन्नात किंवा फळात काही विषारी घटक होते का, याचा शोध आता या अहवालातून लागणार आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी ‘आकस्मिक मृत्यू’ची (ADR) नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे फळे आणि अन्नपदार्थांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कलिंगड अधिक काळ कापून ठेवले होते का किंवा त्यावर काही रासायनिक प्रक्रिया झाली होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. कलिंगडाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच या मृत्यूचे नेमके गूढ उकलणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!