VIDEO : सगळं जळून गेलं… पण सीट नंबर U-7 वर बसलेला जयंत मृत्यूच्या जबड्यातून वाचला!

WhatsApp Group

Bengaluru Hyderabad Accident Bus Fire : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला, ज्याने सर्वांचे हृदय पिळवटून टाकले. एका प्रवासी बसला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण बस धुराने आणि ज्वाळांनी वेढली गेली. त्या आगीत तब्बल 19 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही प्रवाशांनी मृत्यूच्या जबड्यातून जीव वाचवला.

याच बसमधील सीट नंबर U-7 वर बसलेले जयंत कुशवाहा हे त्यापैकी एक भाग्यवान प्रवासी होते. त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर मृत्यूचे तांडव पाहिले आणि कसेबसे बाहेर पडले. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्या भीषण रात्रीचं वर्णन थरकाप उडवणारं केलं आहे.

जयंत म्हणाले, “रात्री सव्वादोन ते पावणातीनच्या सुमारास अचानक धक्क्याने मी जागा झालो. मला वाटलं बसचा अपघात झाला असेल, पण पुढे पाहिलं तर आग लागलेली होती. पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी ज्वाळा उसळत होत्या. सगळे लोक झोपलेले होते. फक्त दोन-तीन जणच जागे होते. आम्ही आरडाओरड सुरू केली आणि लोकांना उठवू लागलो.”

त्यांनी सांगितले की, मुख्य दरवाजा लॉक झाल्यामुळे बाहेर पडणं अशक्य झालं होतं. बसमधला धूर वाढत चालला होता, श्वास घेणं अवघड झालं होतं. “मी बसच्या मधोमध सीट नंबर U-7 वर बसलो होतो. खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला पण तीही अडकली होती. शेवटी मागच्या खिडकीकडे धाव घेतली. काही जणांनी मिळून लाथा मारल्या, पंच मारले आणि अखेर काच फुटली. आम्ही वरून थेट खाली उडी मारली. कोण डोक्याने पडला, कोण पाठीत… पण आम्ही जिवंत राहिलो,” असे जयंत यांनी सांगितले.

त्या आगीत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या, जळत्या आसनांचा वास आणि धुराने भरलेले वातावरण अजूनही जयंत यांच्या डोळ्यासमोर फिरत आहे. त्यांनी सांगितले की, “जर आम्ही ती खिडकी फोडली नसती तर सगळे आतच जळून गेले असतो.”

जयंत पुढे म्हणाले की, “मी बाहेर पडलो तेव्हा एक पोलीस अधिकारी धावत आला आणि फायर ब्रिगेडला कॉल केला. काही मिनिटांत फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काहींना बंगळुरूकडे पाठवले गेले, तर काहींना हैदराबादच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.”

या भीषण घटनेनंतर प्रवासी बस सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला आहे. प्रवासी बसमध्ये सुरक्षा यंत्रणा, इमर्जन्सी एक्झिट आणि ड्रायव्हरची जबाबदारी या सर्व गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment