दिल्लीत आज कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग! कसं काम करतं हे तंत्रज्ञान?

WhatsApp Group

Delhi Cloud Seeding : दिल्लीच्या नागरिकांना अखेर स्वच्छ हवेचा श्वास घेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रदूषणाने त्रस्त असलेल्या राष्ट्रीय राजधानीत पहिल्यांदाच क्लाऊड सीडिंग (Cloud Seeding) म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग होईल. हा या प्रयोगानंतर दिल्लीच्या प्रदूषण समस्येवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलं की, “जर हवामान अनुकूल राहिलं, तर आजच दिल्लीमध्ये पावसाची ‘कृत्रिम सर’ पाहायला मिळेल. सध्या हा प्रयोगासाठीचं विमान कानपूरमध्ये आहे. तिथे हवामान थोडं स्वच्छ झालं की विमान उड्डाण करेल आणि दिल्लीच्या दिशेने येऊन मेघबीज पेरणी करेल.”

त्यांनी पुढे सांगितलं, “कानपूरमध्ये सध्या दृष्यता 2000 मीटर इतकीच आहे. ती 5000 मीटर झाल्यावरच विमान उड्डाण घेईल. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत हे शक्य होईल. त्यानंतर दिल्लीवर क्लाऊड सीडिंग करून पावसाची शक्यता निर्माण होईल.”

क्लाऊड सीडिंग म्हणजे काय?

‘क्लाऊड सीडिंग’ ही अशी वैज्ञानिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सिल्वर आयोडाईड, ड्राय आइस आणि खनिज मीठ अशा विशिष्ट घटकांना ढगांमध्ये सोडले जाते. या रसायनांच्या साहाय्याने ढगांमध्ये पाण्याचे थेंब तयार होतात आणि पाऊस पडतो.

ही तंत्रज्ञान प्रक्रिया पाणीटंचाई असलेल्या किंवा अत्यंत कोरड्या भागांमध्ये पावसाची शक्यता वाढवण्यासाठी वापरली जाते. तसेच धुके कमी करणे, गारांचा पाऊस कमी करणे किंवा तापमान नियंत्रणासाठीही हे तंत्र उपयुक्त ठरते.

हेही वाचा – Viral Video : ट्रेनमध्ये झोपायला जागा नाही? मग या भाईने काय केलं बघा… थेट टॉयलेटचं बेडरूम बनवलं

या फॉर्म्युल्याची निर्मिती IIT कानपूरने केली असून त्यात सिल्वर आयोडाईड नॅनोपार्टिकल्स, आयोडाइज्ड सॉल्ट आणि रॉक सॉल्ट यांचा समावेश आहे.

दिल्लीला कृत्रिम पावसाची गरज का भासली?

दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. हिवाळ्यात तर इथलं वायूप्रदूषण अत्यंत गंभीर पातळीवर जातं. 2024-25 च्या हिवाळ्यात दिल्लीमध्ये PM2.5 पातळी सरासरी १७५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी होती, जी जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षा अनेक पटीने अधिक आहे.

‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट, शिकागो’च्या अहवालानुसार, दिल्लीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे सरासरी आयुर्मान तब्बल 11.9 वर्षांनी कमी झाले आहे.

आज सकाळी 8 वाजता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 306 इतका असून तो “अत्यंत खराब” (Very Poor) श्रेणीत आहे.

  • आनंद विहार : 321
  • आर.के.पुरम : 320
  • सिरी फोर्ट : 350
  • बवाना : 336
  • बुरारी क्रॉसिंग : 326
  • द्वारका सेक्टर 8 : 316
  • मुण्डका : 324
  • नरेला : 303
  • पंजाबी बाग : 323

प्रकल्पाचा खर्च आणि IIT कानपूरची भूमिका

दिल्ली सरकारने 25 सप्टेंबर 2025 रोजी IIT कानपूरसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारानुसार 5 क्लाऊड सीडिंग ट्रायल्स घेण्यात येणार आहेत, ज्यापैकी सर्व प्रयोग उत्तर-पश्चिम दिल्लीत होणार आहेत.

या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ₹3.21 कोटी इतका आहे. विमानसेवेची परवानगी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे, आणि हे प्रयोग 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान करण्यास मान्यता दिली आहे.

मात्र, हवामानातील बदलांमुळे हे प्रयोग यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आले, मेच्या अखेरीला, जूनच्या सुरुवातीला, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात नियोजित असलेले प्रयोग हवामान प्रतिकूलतेमुळे रद्द झाले.

पुढचं पाऊल काय?

प्रयोग यशस्वी झाला, तर दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाच्या मदतीने हवेतील प्रदूषण काही प्रमाणात कमी होईल. यामुळे शहरातील रहिवाशांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच भारतात या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात इतर राज्यांमध्येही वाढवला जाऊ शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment