सोलापूरच्या किरण नवगिरेनं केलं जे आजवर कुणी केलं नव्हतं! महिला टी20 मध्ये रचला इतिहास

WhatsApp Group

Kiran Navgire Century : भारतीय महिला क्रिकेटमधील ‘पॉवर हिटर’ म्हणून ओळखली जाणारी किरण नवगिरे हिने पुन्हा एकदा आपल्या विस्फोटक फलंदाजीने क्रिकेटविश्वाला थक्क केलं आहे. सीनियर महिला टी20 ट्रॉफीच्या सामन्यात सोलापूरच्या या धडाकेबाज खेळाडूने इतिहास रचला. नागपूरविरुद्ध खेळताना किरणने केवळ 34 चेंडूंमध्ये शतक झळकावत महिलांच्या टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

36 चेंडूंमध्ये 106 धावा – चौकारांचा आणि षटकारांचा पाऊस

किरण नवगिरे हिनं एकूण 36 चेंडूंमध्ये 106 धावा ठोकल्या. या वादळी खेळीतून तिनं 14 चौकार आणि 7 षटकार लगावले. तिच्या या शानदार इनिंगमुळे महाराष्ट्र संघाने फक्त 8 षटकांत 111 धावांचे लक्ष्य पूर्ण करत 9 गडी राखून विजय मिळवला. तिचा स्ट्राइक रेट तब्बल 302.86 इतका राहिला, जो महिला टी20 क्रिकेटमध्ये आजवर कोणीही गाठलेला नाही.

सोफी डिवाइनचा विक्रम मागे

या सामन्यापूर्वी महिला टी20 मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डिवाइन हिच्या नावावर होता, जिने 36 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. परंतु आता किरण नवगिरेनं तो विक्रम मोडून टाकला आहे. इतकंच नव्हे तर ती 300 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

मुक्ता मागरेसोबत शतकी भागीदारी

किरणनं दुसऱ्या विकेटसाठी मुक्ता मागरेसोबत 103 धावांची भागीदारी केली. या जोडीतील बहुतेक धावा किरणच्या बॅटवरून आल्या, कारण मुक्ता फक्त 6 धावा करू शकली. या गोष्टीतूनच किरणच्या वादळी खेळीचा अंदाज येतो.

महाराष्ट्राचा विक्रमात प्रवेश

महिला टी20 इतिहासात शतक झळकावून संघाने मिळवलेलं सर्वात कमी लक्ष्याचा विक्रम आता महाराष्ट्राच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम सीएसए टी20 मधील एनेरी डकसन हिच्या नावावर होता, जिने 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत एकटीनं 106 धावा केल्या होत्या.

2022 मधील चर्चेतील खेळी – 162 धावांचा तडाखा

ही पहिली वेळ नाही की किरण नवगिरेने क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. 2022 मध्ये महिला टी20 ट्रॉफीत तिनं अरुणाचल प्रदेशविरुद्ध 76 चेंडूंमध्ये 162 धावा ठोकल्या होत्या. त्या सामन्यात तिनं 35 षटकार मारत विक्रमी झळाळी निर्माण केली होती.
याच सामन्यामुळे ती 150 पेक्षा जास्त धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती.

क्रिकेटविश्वात महाराष्ट्राचा अभिमान

किरण नवगिरे हिचं नाव आता केवळ महाराष्ट्राचं नाही, तर संपूर्ण भारतीय महिला क्रिकेटचं गौरवाचं प्रतीक बनलं आहे. तिच्या प्रत्येक शतकात झळकते ती जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाची झळाळी – जी पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment