Delhi Red Fort Car Blast : लाल किल्ल्याजवळील स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑईल आणि डेटोनेटरचा वापर

WhatsApp Group

Delhi Red Fort Car Blast : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात फॉरेन्सिक पथकाने दिलेल्या अहवालानुसार, या स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑईल आणि डेटोनेटरचा वापर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे तीन घटक एकत्र आल्यावर तयार होणारा ‘ANFO’ स्फोटक पदार्थ अत्यंत शक्तिशाली मानला जातो.

घटना लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या ह्युंदाई i20 कारमध्ये घडली. स्फोट इतका भीषण होता की कारचे तुकडे शेकडो फूटांवर उडाले आणि शेजारी उभ्या गाड्यांनाही आग लागली. स्फोटामुळे 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमींना LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फॉरेन्सिक आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तपास पथकाने घटनास्थळावरून रासायनिक अवशेषांचे नमुने गोळा करून त्यांचा तपास सुरू केला आहे. अंतिम अहवाल अद्याप आलेला नसला तरी प्राथमिक निष्कर्षातून स्फोटासाठी वापरलेला पदार्थ ‘ANFO’ असल्याची खात्री पटली आहे.

‘आत्मघाती हल्ल्याची’ शक्यता वाढली

स्रोतांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना या घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय आहे. ही कार पुलवामातील तारिक नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

तपास यंत्रणांना असंही वाटतं की हा स्फोट ‘फिदायीन-शैलीतील’ आत्मघाती हल्ला असू शकतो. घटनास्थळावरून मिळालेल्या काही पुराव्यांमुळे फरीदाबाद दहशत मॉड्यूलशी संबंधित धागेदोरे मिळत असल्याचं समजतं.

DNA टेस्टद्वारे ओळख होणार

स्फोटाच्या वेळी कारमध्ये असलेला व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद असल्याची शक्यता तपास यंत्रणा वर्तवते. तो मागील काही महिन्यांपासून फरार असून, फरीदाबाद मॉड्यूलचा महत्त्वाचा सदस्य मानला जातो. पोलीस आता स्फोटात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा DNA टेस्टद्वारे उमर मोहम्मदशी संबंध आहे का, हे निश्चित करणार आहेत.

तपासाचा फोकस, स्फोटकांचा स्रोत कोणता?

तपास पथक स्फोटक पदार्थ कुठून आणि कसे मिळाले, यावर लक्ष केंद्रित करत आहे. ANFO हा साधारणपणे औद्योगिक वापरासाठीचा स्फोटक प्रकार असून, तो दहशतवादी हातात गेल्यास प्रचंड विध्वंस घडवू शकतो. पोलिसांना कार हरियाणातील बादरपूर मार्गाने दिल्लीमध्ये प्रवेश करताना दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे.

जागोजागी तपास सुरू, परिसर सील

स्फोटानंतर दिल्ली पोलीस, NIA, NSG कमांडो आणि फॉरेन्सिक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सील करून सीसीटीव्ही फुटेजमधील संशयास्पद हालचालींचा शोध सुरू करण्यात आला आहे. जुनी दिल्ली भाग नेहमीच गजबजलेला असल्याने, या स्फोटाच्या वेळेने तपासाची गंभीरता आणखी वाढवली आहे.

अखेरचा अहवाल प्रतीक्षेत

फॉरेन्सिक विभागाकडून अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. तथापि, प्राथमिक पुरावे आणि तपास यंत्रणांनी मिळवलेल्या धाग्यांमुळे या स्फोटामागे दहशतवादी कटाची शक्यता अधिक दृढ होत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment