Divyanshi Singh NDA Air Force Officer : भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात एका सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा अशा नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि जिद्दीचा झेंडा रोखत, फ्लाईट कॅडेट दिव्यांशी सिंग ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (NDA) मधून प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय वायूसेनेत (IAF) कमिशन्ड होणारी देशातील पहिली महिला अधिकारी ठरली आहे. हैदराबादजवळील दुन्दिगल येथील एअर फोर्स अकॅडमीमध्ये (AFA) पार पडलेल्या २१७ व्या कोर्सच्या कंबाइंड ग्रॅज्युएशन परेडमध्ये हा ऐतिहासिक क्षण देशाने अनुभवला. दिव्यांशीच्या या यशाने केवळ तिच्या कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
या दिमाखदार सोहळ्यात एकूण २३१ फ्लाईट कॅडेट्स उत्तीर्ण झाले, ज्यामध्ये १९४ पुरुष आणि ३७ महिलांचा समावेश होता. मात्र, या संपूर्ण परेडमध्ये सर्वांच्या नजरा दिव्यांशी सिंगवर खिळल्या होत्या. कारण, ती केवळ एक अधिकारी बनत नव्हती, तर भारतीय लष्करातील एका नव्या युगाची ती अग्रदूत ठरली होती.
सर्वोच्च न्यायालयाचा ‘तो’ निकाल अन् क्रांतीची ठिणगी
दिव्यांशी सिंगचा हा प्रवास जितका अभिमानास्पद आहे, तितकाच तो देशातील कायदेशीर आणि सामाजिक परिवर्तनाचा साक्षीदार आहे. २०२१ पर्यंत पुण्याच्या खडकवासला येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे (NDA) दरवाजे महिला उमेदवारांसाठी बंद होते. मात्र, २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक सुनावणीदरम्यान लष्करातील लैंगिक असमानतेवर बोट ठेवत महिलांनाही NDA ची प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी दिली.
Divyanshi Singh set to become India's first NDA-trained woman Air Force officer – India Today https://t.co/nNYnWn2ek3
— shreela (@skeetara) June 15, 2026
हेही वाचा – जागतिक महायुद्धाचा धोका टळला! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक १४ कलमी शांतता करार; हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली!
या निर्णयाने देशातील हजारो तरुणींच्या स्वप्नांना पंख दिले. २०२२ मध्ये जेव्हा NDA ने पहिल्यांदा महिला कॅडेट्सना प्रवेश दिला, तेव्हा निवडक पाच महिलांमध्ये दिव्यांशी सिंगने आपले स्थान पक्के केले होते. तीन वर्षांचे खडतर आणि आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून, या पहिल्या बॅचच्या महिला कॅडेट्सनी मार्च २०२५ मध्ये NDA मधून पदवी घेतली. त्यानंतर दिव्यांशीने आपल्या ‘ग्राउंड ड्युटी’ शाखेच्या विशेष प्रशिक्षणासाठी हैदराबादच्या एअर फोर्स अकॅडमीमध्ये पाऊल ठेवले होते.
पुरुष कॅडेट्सच्या खांद्याला खांदा: दिव्यांशीचे खडतर प्रशिक्षण
NDA मधील प्रशिक्षण हे जगातील सर्वात कठीण लष्करी प्रशिक्षणांपैकी एक मानले जाते. दिव्यांशीने येथे कोणत्याही सवलतीची अपेक्षा न ठेवता, पुरुष कॅडेट्सच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आव्हानाचा सामना केला. शारीरिक तंदुरुस्ती, खडतर मैदानी कसरती, लष्करी शिस्त, नेतृत्वगुण आणि रणनीती या सर्वच आघाड्यांवर तिने स्वतःला सिद्ध केले.
तिच्या याच अफाट क्षमतेमुळे तिला प्रशिक्षण दरम्यान ‘कॅडेट क्वार्टर मास्टर सार्जंट’ (CQMS) हे अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे पद देण्यात आले होते. कॅडेट्सचे प्रशासन, शिस्त आणि व्यवस्थापन सांभाळण्याची मोठी जबाबदारी या पदावर असणाऱ्या व्यक्तीवर असते. दिव्यांशीने हे पद भूषवून हे दाखवून दिले की, नेतृत्व करण्याची क्षमता रक्तामध्ये आणि जिद्दीमध्ये असते, लिंगावर नाही.
संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘प्रसिडेंट्स कमिशन’ प्रदान
दुन्दिगल येथील परेडचे निरीक्षण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले. त्यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व कॅडेट्सना ‘प्रसिडेंट्स कमिशन’ प्रदान केले. संरक्षण मंत्र्यांनी दिव्यांशी सिंग आणि तिच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय लष्कर आता अधिक सर्वसमावेशक आणि आधुनिक बनत चालले आहे, जिथे महिला केवळ साहाय्यक भूमिकेत नसून थेट निर्णय प्रक्रियेत आणि संरक्षणाच्या आघाडीवर सक्रिय आहेत.
लष्करातील हा बदल केवळ वायूसेनेपुरता मर्यादित नाही. यापूर्वी २०२५ मध्येच डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीनेही (IMA) आपल्या इतिहासातील पहिल्या महिला अधिकारी कॅडेट्सच्या बॅचला उत्तीर्ण केले होते. हाच धागा पकडत आता दिव्यांशीने वायूसेनेच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा