भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, श्रेयस अय्यर नवा कॅप्टन!

WhatsApp Group

Shreyas Iyer T20 captain : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टी-२० संघाची घोषणा करताना एक अत्यंत धक्कादायक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला तडकाफटकी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची भारताचा नवीन टी-२० कर्णधार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, बोर्डाने आता आगामी २०२८ मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने युवा रक्ताला प्राधान्य देण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सूर्या युगाचा अस्त? ‘या’ कारणांमुळे बीसीसीआयने घेतला कडक निर्णय

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जग गाजवणाऱ्या ३५ वर्षीय सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्याचा निर्णय सोपा नव्हता. मात्र, निवड समितीने भविष्याचा विचार करून हा अत्यंत व्यावहारिक निर्णय घेतला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सूर्याने ९ डावात १३६.७२ च्या स्ट्राईक रेटने २४२ धावा केल्या होत्या, ज्या त्याच्या दर्जानुसार अत्यंत सामान्य होत्या. त्यानंतर आयपीएल २०२६ मध्येही त्याची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. आयपीएलच्या १३ डावात त्याने अवघ्या २०.७६ च्या सरासरीने आणि १४७.५४ च्या स्ट्राईक रेटने २७० धावा केल्या.

सध्या सूर्या ३५ वर्षांचा आहे आणि २०२८ च्या पुढील विश्वचषकापर्यंत तो ३८ वर्षांचा होईल. ऑलिम्पिक आणि विश्वचषकासाठी पूर्णपणे तरुण आणि तंदुरुस्त संघ तयार करण्याच्या अजेंड्यामुळे सूर्यकुमार यादवच्या टी-२० कारकिर्दीला आता पूर्णविराम मिळतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

श्रेयस अय्यरचे धमाकेदार पुनरागमन: थेट भूषवणार कर्णधारपद

दुसरीकडे, डिसेंबर २०२३ पासून भारतीय टी-२० संघात एकाही सामन्यासाठी जागा न मिळालेल्या ३१ वर्षीय श्रेयस अय्यरचे नशीब पूर्णपणे पालटले आहे. संघात मध्यक्रमात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचे स्थान पक्के असल्याने श्रेयसला सतत डावलले जात होते. अगदी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त खेळाडूचा पर्याय म्हणून त्याची निवड झाली होती, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

मात्र, श्रेयस अय्यरचा आयपीएलमधील कर्णधारपदाचा रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) स्वतःच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. तर २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्सला फायनलपर्यंत पोहोचवले होते. फलंदाज म्हणूनही त्याने आयपीएल २०२५ मध्ये १७५.०७ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा आणि आयपीएल २०२६ मध्ये १६८.८१ च्या स्ट्राईक रेटने ४९८ धावा कुटल्या होत्या.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना श्रेयसच्या नियुक्तीचे समर्थन केले. आगरकर म्हणाले,

“श्रेयसने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या फ्रँचायझींचे नेतृत्व कसे केले आहे, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्याने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे आणि कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. एका कर्णधाराला ज्या ज्या अनुभवातून जावे लागते, ते सर्व त्याने पाहिले आहे. माझी वैयक्तिक प्रामाणिक भावना आहे की, सध्याच्या घडीला कर्णधारपदासाठी तोच सर्वात योग्य आणि अनुभवी उमेदवार आहे.”

उपकर्णधारपदात पुन्हा बदल: टिळक वर्माकडे नवी जबाबदारी

निवड समितीने अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी युवा खेळाडू टिळक वर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. गेल्या आठ महिन्यांतील भारतीय टी-२० संघातील उपकर्णधारपदाचा हा तिसरा बदल आहे. यापूर्वी शुबमन गिलकडे ही जबाबदारी होती, पण विश्वचषकात दोन यष्टिरक्षकांना संघात स्थान द्यायचे असल्याने गिलला बाहेर बसावे लागले होते. त्यानंतर अक्षरकडे ही जबाबदारी आली. आता २०२८ च्या दोन वर्षांच्या चक्राचा विचार करता, टिळक वर्मा हा भविष्यातील मोठा खेळाडू असल्याने त्याला कर्णधारपदाचे धडे प्रत्यक्ष मैदानावर गिरवता यावेत, यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात; १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी संघात!

या संघ निवडीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. १९८० च्या दशकात सचिन तेंडुलकरने वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात वैभवने २३७.३० च्या अद्भूत स्ट्राईक रेटने तब्बल ७७६ धावा चोपून काढल्या होत्या. या वादळी कामगिरीचे बक्षीस त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळून मिळाले आहे.

आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी वैभव श्रीलंका येथे ९ ते २१ जून दरम्यान होणाऱ्या त्रिकोणीय मालिकेत ‘भारत अ’ संघाकडून खेळणार आहे. जर त्याने आयर्लंड किंवा इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले, तर तो वयाची १६ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा भारताचा पहिला खेळाडू ठरेल. सध्या वॉशिंग्टन सुंदर हा भारताचा सर्वात तरुण टी-२० पदार्पण करणारा खेळाडू आहे, ज्याने वयाच्या १८ व्या वर्षी पहिली कॅप मिळवली होती.

दिग्गज खेळाडूंना डच्चू; हार्दिक-बुमराहला आराम

नव्याने जाहीर झालेल्या संघातून विश्वविजेत्या संघाचे मुख्य सदस्य असलेल्या रिंकू सिंग आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला थेट वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी नितीश कुमार रेड्डी, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना आगामी कठीण आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता विश्रांती देण्यात आली आहे. भारत २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडच्या बेलफास्ट येथे दोन टी-२० सामने खेळणार आहे, तर त्यानंतर १ ते ११ जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

‘भारत अ’ संघाचीही घोषणा; ध्रुव जुरेल कर्णधार, रणजीचा हिरो अकिब नबी इन!

ज्येष्ठ संघाच्या श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘भारत अ’ (India A) संघाच्या श्रीलंका दौऱ्याचीही घोषणा करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून देवदत्त पडिक्कल उपकर्णधार असेल. या संघात ऋतुराज गायकवाड, बी. साई सुदर्शन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

सर्वात महत्त्वाची निवड म्हणजे जम्मू-काश्मीरला ऐतिहासिक रणजी करंडक जिंकवून देणारा वेगवान गोलंदाज अकिब नबी याची संघात एन्ट्री झाली आहे. अकिबने रणजी हंगामात अवघ्या १२.५६ च्या सरासरीने तब्बल ६० बळी घेतले होते. याशिवाय, जानेवारी २०२० पासून एकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेला उत्तर प्रदेशचा लेगस्पिनर जीशान अन्सारी याला संघात स्थान देऊन निवड समितीने सर्वांनाच चकित केले आहे.

भारत अ संघ (४ दिवसीय सामन्यांसाठी):

ध्रुव जुरेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), बी. साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, सारांश जैन, गुरनूर ब्रार, अकिब नबी, यश ठाकूर, अंशुल कंबोज, एन. जगदीशन, जीशान अन्सारी, अमन मोखाडे, शेख रशीद.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment