Bank Manager Locks Staff Viral Video : खासगी क्षेत्रातील विशेषतः बँकिंग क्षेत्रातील वाढता ताण आणि ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ (घातक कार्यसंस्कृती) पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. एका बँकेच्या व्यवस्थापकाने (बँक मॅनेजर) दिलेल्या टार्गेटचे काम पूर्ण न झाल्यामुळे आपल्याच कर्मचाऱ्यांना बँकेच्या शाखेत कुलूप लावून कोंडून ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून या मॅनेजरच्या हुकूमशाही वृत्तीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमके काय घडले व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, बँकेचे मुख्य प्रवेशद्वार किंवा लोखंडी गेट आतून कुलूप लावून बंद करण्यात आले आहे. बँक मॅनेजरने स्वतः हे गेट लॉक केले असून, जोपर्यंत ठरवून दिलेले काम किंवा टार्गेट पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणालाही घरी जाता येणार नाही, अशी आक्रमक भूमिका मॅनेजरने घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला.
Bank Manager locks gate and forces staff to stay in branch till late night pic.twitter.com/oSFLwa5O4o
— Hellobanker (@Hellobanker_in) July 19, 2026
बँकेचे नाव आणि ठिकाण अद्याप अस्पष्ट
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संबंधित बँक नेमकी कोणती आहे आणि ही घटना कोणत्या शहरातील शाखेत घडली आहे, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संभाषणावरून ही घटना भारतातीलच एका मोठ्या खासगी बँकेची असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक ग्राहक आणि नेटकऱ्यांनी विविध बँकांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सना टॅग करून, या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि दोषी मॅनेजरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘टॉक्सिक वर्क कल्चर’वर पुन्हा एकदा चर्चा
यापूर्वीही काही बड्या खासगी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठकांमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे आणि अपमानास्पद वागणूक दिल्या व्हिडिओ समोर आले आहेत. या नव्या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्या मानवी हक्कांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर कमालीचा चर्चेत असून, बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. जरी या बँकेचे नाव अद्याप अधिकृतपणे समोर आले नसले, तरी वाढत्या दबावामुळे संबंधित बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला किंवा कामगार न्यायालयाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागणार असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत या बँकेची ओळख पटल्यानंतर संबंधित मॅनेजरवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा