Philippines earthquake : सोमवारची ती प्रसन्न सकाळ… सुट्ट्यांनंतर मुलांचे पाऊल पुन्हा एकदा शाळेकडे वळले होते. फिलीपिन्सच्या दाव्हाओ ऑक्सिडेंटल (Davao Occidental) प्रांतातील महायाहाय एलिमेंटरी स्कूलमध्ये (Mahayahay Elementary School) शेकडो निष्पाप मुले गणवेश घालून परिपाठासाठी मैदानावर एकत्र आली होती. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याची तयारी सुरू होती. पण, निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. सकाळी ठीक ७वाजता ३७ मिनिटांनी अचानक पायाखालची जमीन अशी काही हादरली, जणू काही पाताळातून पृथ्वीला कोणीतरी जोरात हलवत आहे. एका क्षणात आनंदाचे वातावरण विनाशाच्या थरारात बदलले. फिलीपिन्समध्ये सोमवारी सकाळी आलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या महाभूकंपात आतापर्यंत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
हा भूकंप गेल्या तीन दशकांतील फिलीपिन्समधील सर्वात शक्तिशाली आणि विनाशकारी भूकंप ठरला आहे. या घटनेचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
थेट कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा थरार!
शिक्षण विभागाने (DepEd) शेअर केलेल्या अधिकृत व्हिडिओमध्ये, भूकंप झाला त्या वेळची भयावह परिस्थिती स्पष्ट दिसत आहे. मैदानावर रांगेत उभी असलेली लहान मुले भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे स्वतःचा तोल सांभाळू शकत नव्हती. जमीन एखाद्या नौकेसारखी डोलत होती. घाबरलेली लहान मुले एकमेकांना आणि आपल्या शिक्षकांना घट्ट पकडून रडत होती, किंचाळत होती. या गोंधळाच्या दरम्यान, मुलांच्या अगदी पाठीमागे असलेले एक पत्र्याचे छप्पर पत्त्यांसारखे कोसळले.
A powerful magnitude 7.8 earthquake today, June 8, 2026, violently shook Mahayahay Elementary School in Malita, Davao Occidental, Philippines. pic.twitter.com/tI7zwD3NeY
— Weather Monitor (@WeatherMonitors) June 8, 2026
शिक्षकांचे शौर्य आणि आपत्ती व्यवस्थापन:
अत्यंत प्रतिकूल आणि भीतीदायक परिस्थितीतही शाळेच्या शिक्षकांनी आणि आपत्ती व्यवस्थापन संयोजकांनी कमालीचे धैर्य दाखवले. त्यांनी तात्काळ सुरक्षा प्रोटोकॉल लागू केला. घाबरलेल्या मुलांना मुख्य इमारतींपासून दूर, मैदानाच्या मधोमध सुरक्षित ठिकाणी हलवले. शिक्षकांच्या या तत्परतेमुळे महायाहाय शाळेतील एकाही मुलाला किंवा कर्मचाऱ्याला साधी चोटही लागली नाही, हीच या संपूर्ण दुर्घटनेतील एकमेव दिलासादायक बाब ठरली.
WATCH: Building collapses after magnitude 7.8 earthquake strikes the Philippines pic.twitter.com/8Q9XFK6Gf8
— BNO News Live (@BNODesk) June 8, 2026
३६ वर्षांतील सर्वात मोठा भूकंप
फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजी (PHIVOLCS) नुसार, हा ७.८ तीव्रतेचा ‘थ्रस्ट-फॉल्ट’ भूकंप १९९० नंतरचा देशातील सर्वात मोठा भूकंप आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सारंगानी (Sarangani) प्रांताच्या किनारपट्टीजवळ जमिनीखाली नोंदवला गेला. भूकंपाची तीव्रता ‘इंटेंसिटी ८’ (Very Destructive) इतकी मोजली गेली आहे, ज्याचा अर्थ हा अत्यंत विनाशकारी प्रलय होता.
दक्षिण मिंडानाओ (Mindanao) प्रदेशात या भूकंपामुळे प्रचंड पायाभूत नुकसान झाले आहे. जनरल सँटोस शहरात (General Santos City) बहुमजली इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये एका प्रसिद्ध ‘जॉलीबी’ फास्ट-फूड रेस्टॉरंटची इमारत आणि एका स्थानिक रेडिओ स्टुडिओचे कार्यालय पूर्णपणे जमीनदोस्त झाले. प्रसिद्ध नोट्रे डेम ऑफ डॅडिएंगस युनिव्हर्सिटीच्या (Notre Dame of Dadiangas University) कॅम्पसचा मोठा भाग कोसळला असून अनेक शॉपिंग मॉल्सच्या भिंती आणि छत पत्त्यासारखे गळून पडले आहेत.
BREAKING: Massive damage seen at General Santos International Airport in General Santos, Philippines after the powerful earthquake.
— Scope Report (@ScopeReportLive) June 8, 2026
pic.twitter.com/nmzwACVtZs
वीज, पाणी आणि दळणवळण यंत्रणा कोलमडली
नॅशनल ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ फिलीपिन्सने (NGCP) दिलेल्या माहितीनुसार, मुख्य वीज वाहक वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, दक्षिण भागातील डझनभर प्रांतांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.
याशिवाय, जनरल सँटोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Gensan Airport) रनवेला आणि टर्मिनल इमारतीला मोठ्या भेगा गेल्याने विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे १७ हून अधिक व्यावसायिक विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले आहे.
त्सुनामीचा हाय-अलर्ट आणि राष्ट्राध्यक्षांचे आदेश
या महाभूकंपानंतर संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात त्सुनामीचे सावट पसरले आहे. फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस जुनियर (Ferdinand Marcos Jr) यांनी तात्काळ आणीबाणीची बैठक घेऊन किनारपट्टीच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना त्वरित उंचावर जाण्याचे आदेश दिले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर सामान्य भरतीपेक्षा १ मीटर ते ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या विनाशकारी लाटा धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केवळ फिलीपिन्सच नव्हे, तर शेजारील इंडोनेशिया, तैवान आणि पापुआ न्यू गिनी या देशांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा