४० लाखांचं सोनं पाहूनही डगमगलं नाही मन; तिरुपतीमधील ‘या’ महिला कॅशियरनं जिंकली लाखो लोकांची मने!

WhatsApp Group

Tirupati Cashier Returns Gold Worth 40 Lakh : आजच्या काळात जिथे माणूस पैशासाठी काहीही करायला तयार होतो, तिथे प्रामाणिकपणाचे एक अतिशय सुंदर आणि थक्क करणारे उदाहरण देवभूमी तिरुपतीमधून समोर आले आहे. तिरुपतीमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामास आलेल्या कुटुंबाने घाईघाईत चक्क ४० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग खोलीतच विसरली. मात्र, त्या हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या ‘शशी’ नावाच्या महिला कॅशियरने प्रचंड प्रामाणिकपणा दाखवत ही ४० लाखांची सोन्याची बॅग पोलिसांच्या उपस्थितीत मूळ मालकाकडे सुपूर्द केली आहे.

या अतुलनीय प्रामाणिकपणाबद्दल तिरुपती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) एल. सुब्बारायडू यांनी स्वतः कॅशियर शशी यांचा शाल पांघरून गौरव केला असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.

बंगळुरूला पोहोचल्यावर उडाला थरकाप!

दागिन्यांचे मूळ मालक ‘भरत’ यांनी या संपूर्ण घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ते आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे आले होते आणि एका हॉटेलमध्ये मुक्कामास होते. तिथून निघताना घाईघाईत त्यांची सोन्याचे दागिने असलेली बॅग हॉटेलच्या खोलीतच राहिली.

“आम्ही जेव्हा तिरुपतीवरून थेट कर्नाटकची राजधानी बंगळुरूला पोहोचलो, तेव्हा अचानक आम्हाला जाणीव झाली की सोन्याची मुख्य बॅग तर हॉटेलमध्येच सुटली आहे. हे समजताच आमचे हात-पाय गळाले आणि संपूर्ण कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. आम्ही तातडीने तिरुपती पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली,” असे भरत यांनी सांगितले.

हेही वाचा – वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासून का राहावं लागणार वेगळं? कारण थक्क करणारं!

महिला कॅशियरने जपली माणुसकी

भरत यांनी पोलिसांना माहिती देण्यापूर्वीच, हॉटेलची महिला कॅशियर शशी हिला खोलीची स्वच्छता करताना ती बॅग सापडली होती. बॅग उघडून पाहताच त्यात ४० लाख रुपयांचे मौल्यवान सोन्याचे दागिने असल्याचे तिच्या निदर्शनास आले. एवढी मोठी रक्कम आणि सोने समोर असूनही शशी यांचे मन विचलित झाले नाही. त्यांनी तातडीने ती बॅग सुरक्षित ठिकाणी ठेवून व्यवस्थापनाला आणि पोलिसांना याची माहिती दिली.

तिरुपती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) एल. सुब्बारायडू यांच्या मुख्य उपस्थितीत पोलीस कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी कॅशियर शशी यांनी अधिकृतपणे ती ४० लाखांची सोन्याची बॅग भरत यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. आपले हरवलेले सोने सुखरूप हाती आल्यानंतर भरत यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी “शशी यांनी आमचे दागिने सुरक्षित ठेवले, मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन,” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

खाकीने केला सॅल्युट!

सध्याच्या युगात ४० लाख रुपयांचे सोने पाहून प्रामाणिक राहणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पोलीस अधीक्षक एल. सुब्बारायडू यांनी शशी यांच्या या प्रामाणिकपणाला कडक सॅल्युट ठोकला. त्यांनी शशी यांना सन्मानपूर्वक शाल परिधान केली आणि “असे प्रामाणिक कर्मचारी हे समाजासाठी आदर्श आहेत,” अशा शब्दांत गौरव केला. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, संपूर्ण देशातून महिला कॅशियर शशी यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment