Annu Kapoor On Om Puri : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अन्नू कपूर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वैयक्तिक गौप्यस्फोट केले आहेत. ओम पुरी हे एक महान कलाकार होते यात शंका नाही, मात्र त्यांनी पती म्हणून माझ्या बहिणीचा विश्वासघात केला आणि तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले, असा गंभीर आरोप अन्नू कपूर यांनी केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अन्नू कपूर यांची बहीण सीमा कपूर यांचा विवाह ओम पुरी यांच्याशी झाला होता. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. सीमा कपूर गरोदर असतानाच ओम पुरी यांचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे त्यांना समजले, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी खळबळ उडाली होती. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर यांनी या जुन्या जखमांना पुन्हा उजाळा दिला आहे.
अन्नू कपूर म्हणाले, “ओम पुरी हे एक विलक्षण अभिनेते होते. त्यांच्यासारखा मोठा कलाकार दुसरा कोणी नव्हता, पण ती गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा ते कोणाचे तरी पती झाले, तेव्हा त्यांनी एका स्त्रीचा विश्वासघात केला. तिथेच सर्व गोष्टी बिघडल्या आणि मी त्या स्त्रीचा भाऊ आहे.”
“शरीर साथ देईनासं झाल्यावर ते पुन्हा परतले”
अन्नू कपूर यांनी मुलाखतीत सांगितले की, आयुष्याच्या शेवटच्या काळात जेव्हा ओम पुरी यांचे शरीर थकले होते आणि ते कमकुवत झाले होते, तेव्हा ते पुन्हा सीमा कपूर यांच्याकडे परतले होते. कपूर म्हणाले, “जर माझ्या बहिणीने त्यांची काळजी घेतली नसती, तर ते १० वर्षांपूर्वीच गेले असते. जेव्हा त्यांना कोणाचाच आधार उरला नाही, तेव्हा ते परत आले. मला माझ्या बहिणीचाही राग आला होता की तिने त्यांना पुन्हा का स्वीकारले.”
अन्नू कपूर यांनी पुढे स्पष्ट केले की, ओम पुरी यांना त्यांची खूप भीती वाटत असे कारण ते नेहमीच तोंडावर स्पष्ट बोलत असत. आपल्या बहिणीला कोणताही आधार उरला नाही, याची खंत आजही त्यांना सतावत आहे.
सीमा कपूर यांनी मांडली होती आपली व्यथा
गेल्या वर्षी सीमा कपूर यांनी देखील एका मुलाखतीत आपल्या संघर्षाचा प्रवास सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, ‘सिटी ऑफ जॉय’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ओम पुरी यांचे नंदिता पुरी यांच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले होते. सीमा कपूर जेव्हा तीन महिन्यांच्या गरोदर होत्या, तेव्हा त्यांना या फसवणुकीबद्दल समजले.
त्या म्हणाल्या, “माझ्या अनेक मित्रांना या प्रकरणाबद्दल माहिती होती, पण त्यांनी मला अंधारात ठेवले. शेवटी ओम पुरी यांनी स्वतः मला फोन करून सांगितले की ते दुसऱ्या कोणाचे तरी झाले आहेत. त्या काळात ओम पुरी खूप दारू पिऊ लागले होते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती, म्हणून मी घर सोडण्याचा निर्णय घेतला.”
स्वाभिमानासाठी नाकारली मदत
विभक्त झाल्यानंतर ओम पुरी यांनी सीमा कपूर यांना पोटगी म्हणून ६ लाख रुपये दिले होते. मात्र, त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा ओम पुरी यांनी आपल्या सेक्रेटरीमार्फत २५ हजार रुपये पाठवले होते. सीमा कपूर यांनी ते पैसे नाकारले. “लोकांना वाटले तो माझा अहंकार आहे, पण तो माझा स्वाभिमान होता,” असे सीमा कपूर यांनी स्पष्ट केले होते.
ओम पुरी यांनी १९९३ मध्ये नंदिता पुरी यांच्याशी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना इशान हा मुलगा आहे. २०१७ मध्ये ओम पुरी यांचे निधन झाले. निधनापूर्वीच्या काही वर्षांत त्यांनी सीमा कपूर यांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली होती, असेही समजते. अन्नू कपूर यांनी आता या सर्व गोष्टी उघड केल्यामुळे बॉलिवूड वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा