Godzilla El Nino : मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या हवामान बदलांपैकी एक असलेले महाभयंकर नैसर्गिक संकट सध्या प्रशांत महासागराच्या पोटात आकाराला येत आहे. जागतिक हवामान शास्त्रज्ञांनी या आगामी संकटाला ‘गॉडझिला एल निनो’ (Godzilla El Niño) असे नाव दिले असून, यामुळे २०२६ आणि २०२७ या वर्षांमध्ये जागतिक हवामानाचे संपूर्ण गणित बिघडणार असल्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) जागतिक हवामान संघटनेने (WMO) जाहीर केले आहे की, जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तब्बल ८०% आहे, तर नोव्हेंबर २०२६ पर्यंत ही शक्यता ९०% वर पोहोचणार आहे.
अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिस्ट्रेशन’ (NOAA) या संस्थेने देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून, हा उष्णतेचा पॅटर्न अत्यंत वेगाने विस्तारत असून तो उत्तर गोलार्धातील २०२६-२७ च्या हिवाळ्यापर्यंत कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. हा इशारा केवळ एका हवामान बदलाचा नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा आणि मानवी जीवनाला हादरवून टाकणाऱ्या एका मोठ्या संकटाची नांदी आहे.
‘गॉडझिला एल निनो’ म्हणजे नेमके काय?
सामान्यतः ‘एल निनो’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते. परंतु, जेव्हा हे तापमान सरासरीपेक्षा खूपच जास्त वाढते आणि त्याचे क्षेत्र अथांग पसरते, तेव्हा त्याला हवामान तज्ज्ञ ‘गॉडझिला एल निनो’ असे म्हणतात. हे नाव त्याच्या अक्राळविक्राळ रूपामुळे आणि जगावर होणाऱ्या त्याच्या विनाशकारी परिणामांमुळे देण्यात आले आहे.
हेही वाचा – VIDEO : मुख्यमंत्री विजय यांच्याकडून प्रज्ञानंदवर कौतुकाचा वर्षाव आणि 50 लाखांचे बक्षीस!
NOAA च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा प्रशांत महासागरातील पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाहणारे व्यापारी वारे (Trade Winds) अचानक कमकुवत होतात, तेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्ण पाणी पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेच्या किनारपट्टीकडे सरकू लागते. पाण्याचा हा प्रचंड उष्ण साठा संपूर्ण जगाचे पर्जन्यमान, उष्णतेच्या लाटा आणि वादळांचे मार्ग पूर्णपणे बदलून टाकतो. यामुळे जगातील काही भागांमध्ये भीषण दुष्काळ पडतो, तर काही देशांमध्ये ढगफुटी आणि महापुराचे थैमान पाहायला मिळते.
भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होणार?
भारतासाठी सर्वात मोठी काळजीची बाब म्हणजे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्र ज्या नैऋत्य मान्सूनवर अवलंबून आहे, त्या मान्सूनला एल निनो थेट प्रभावित करतो. ऐतिहासिक आकडेवारी नजर टाकल्यास असे दिसून येते की, ज्या ज्या वर्षी प्रशांत महासागरात एल निनो तीव्र झाला आहे, त्या बहुतांश वर्षांमध्ये भारतातील मान्सून कमकुवत झाला असून देशाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.
रॉयटर्सच्या (Reuters) एका अहवालानुसार, संयुक्त राष्ट्रांनी आधीच स्पष्ट केले आहे कि, एल निनोचे हे तीव्र रूप दक्षिण आशिया, विशेषतः भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामान निर्माण करू शकते. मान्सूनचे वारे कमकुवत झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटू शकते, ज्यामुळे पेरण्या खोळंबण्याची आणि भूजल पातळी खालावण्याची भीती आहे.
स्थानिक हवामान ठरणार गेमचेंजर
तथापि, शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक बाजू देखील मांडली आहे. जरी एल निनो जागतिक स्तरावर मान्सून कमकुवत करण्याचे संकेत देत असला, तरी स्थानिक हवामान प्रणाली जसे की ‘इंडियन ओशन डायपोल’ (Indian Ocean Dipole – IOD) जर सकारात्मक असेल, तर तो एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात मोडून काढू शकतो. म्हणूनच, भारताचे हवामान शास्त्रज्ञ सध्या प्रशांत महासागरासोबतच हिंदी महासागरातील घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत.
संभाव्य परिणाम आणि भविष्यातील आव्हाने
‘गॉडझिला एल निनो’चा फटका केवळ शेतीलाच बसेल असे नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम देशाच्या ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्रावर होणार आहेत:
पिण्याच्या पाण्याचे संकट: भूजल पातळी घटल्यामुळे आणि धरणांमधील पाणी साठा आटल्यामुळे शहरांसह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू शकते.
कृषी क्षेत्राला फटका: पाऊस कमी झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे अन्नधान्याची महागाई वाढेल.
ऊर्जा संकट: तीव्र उष्णतेमुळे देशात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचेल, तर दुसरीकडे जलाशयांमध्ये पाणी कमी असल्यामुळे जलविद्युत निर्मितीवर मर्यादा येतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा