PM Modi : देशाच्या राजकारणातील एका मोठ्या घडामोडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. संसदेत महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणलेले महत्त्वपूर्ण घटना दुरुस्ती विधेयक फेटाळले गेल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
विधेयकाचा लोकसभेत पराभव: काय आहे संपूर्ण प्रकरण?
शुक्रवारी रात्री उशिरा लोकसभेत संविधानाच्या १३१ व्या दुरुस्ती विधेयकावर मतदान झाले. हे विधेयक महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) प्रक्रियेशी संबंधित होते. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ३३ टक्के महिला आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. मात्र, हे विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत सरकारला गाठता आले नाही. ५२८ खासदारांनी मतदान केले, ज्यापैकी २९८ मते विधेयकाच्या समर्थनार्थ पडली, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले.
हेही वाचा – 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारची मोठी भेट; 2 टक्के महागाई भत्ता मंजूर!
विरोधकांचा आक्षेप आणि राहुल गांधींची भूमिका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. तामिळनाडूतील एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हे विधेयक केवळ महिला आरक्षणापुरते मर्यादित नसून त्यामागे ‘डिलिमिटेशन’चा छुपा अजेंडा आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे तामिळनाडू आणि इतर दाक्षिणात्य राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होऊन त्यांचा आवाज कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत हा राज्यांचा संघ असून प्रत्येक राज्याची भाषा आणि परंपरा सुरक्षित राहिली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
पंतप्रधानांच्या भाषणातून काय अपेक्षा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनात महिला आरक्षणाचे महत्त्व आणि ते लागू करण्यातील तांत्रिक अडचणींवर सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच, विरोधकांनी हे विधेयक का रोखले, यावरही ते आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. २०२९ च्या निवडणुकीपूर्वी महिलांना हक्क देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन ते पुन्हा एकदा देऊ शकतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा