R Praggnanandhaa Norway Chess title : भारताचा तरुण आणि धडाकेबाज ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने जागतिक बुद्धिबळातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण मानली जाणारी ‘नॉर्वे चेस’ (Norway Chess) स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. शुक्रवारी झालेल्या अंतिम आणि अत्यंत चुरशीच्या फेरीत प्रज्ञानंदने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमर याच्यावर क्लासिकल गेममध्ये मात करत विजेतेपदाच्या मुकुटावर आपले नाव कोरले.
या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व इतके मोठे आहे की, २०१३ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून आजतागायत भारताचे दिग्गज विश्वनाथन आनंद किंवा भारताचा सध्याचा जागतिक विजेता डी गुकेश यांनाही ही स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. हा पराक्रम करणारा प्रज्ञानंद हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
शेवटच्या फेरीतील तो थरार आणि गुणतालिकेचे समीकरण
स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी प्रज्ञानंद १५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. विजेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आणि इतिहास रचण्यासाठी त्याला कोणत्याही परिस्थितीत क्लासिकल गेममध्ये विजय मिळवणे अनिवार्य होते, कारण क्लासिकल गेममधील विजयासाठी थेट ३ गुण मिळत होते. प्रज्ञानंदने अगदी योग्य वेळी आपला गिअर बदलला आणि दबावाच्या परिस्थितीत कमालीचा संयम दाखवत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह प्रज्ञानंदने आपल्या खात्यात ३ मौल्यवान गुण जोडत एकूण १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.
🇮🇳 PRAGGNANANDHAA IS THE NORWAY CHESS CHAMPION 2026 👏👏👏#NorwayChess
— Norway Chess (@NorwayChess) June 5, 2026
📷 Norway Chess / Tor Nilssen & Kjetil V. Tveito pic.twitter.com/cFEQudz2Em
दुसरीकडे, अंतिम फेरीपूर्वी १५.५ गुणांसह आघाडीवर असलेला अमेरिकेचा तगडा ग्रँडमास्टर वेस्ली सो याला अलिरेझा फिरोझाविरुद्धच्या क्लासिकल सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. यामुळे हा सामना ‘आर्मागेडन’ (Armageddon) टाय-ब्रेकरमध्ये गेला. आर्मागेडनमध्ये वेस्ली सो याने विजय मिळवला खरा, पण या टाय-ब्रेकर विजयासाठी केवळ १.५ गुण मिळतात. त्यामुळे वेस्ली सोचा एकूण स्कोअर १७ गुणांवरच रेंगाळला आणि तो प्रज्ञानंदपेक्षा अवघ्या एका गुणाने मागे राहिला. अलिरेझा फिरोझा १५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
नंबर १ मॅग्नस कार्लसनला दोनदा चारली धूळ!
प्रज्ञानंदचा या स्पर्धेतील प्रवास सोपा नव्हता. जगातील अव्वल ६ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या एलिट स्पर्धेत प्रज्ञानंदची सुरुवात अत्यंत संथ झाली होती. मात्र, स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याने जी गती घेतली, त्याने संपूर्ण क्रीडाविश्व थक्क झाले.
या संपूर्ण मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रज्ञानंदने ७ वेळचा नॉर्वे चेस चॅम्पियन आणि जगातील नंबर १ खेळाडू मॅग्नस कार्लसन याला याच स्पर्धेत क्लासिकल बुद्धिबळात तब्बल दोनदा पराभूत केले. कार्लसनला त्याच्याच देशात, त्याच्याच घरच्या मैदानावर दोनदा पराभूत करणे ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक मानली जाणारी गोष्ट आहे. या कामगिरीने प्रज्ञानंदने दाखवून दिले की, तो केवळ भविष्यातील स्टार नाही, तर सध्याच्या घडीला जगातील कोणत्याही दिग्गजाला नमवण्याची ताकद त्याच्या मनगटात आणि बुद्धीत आहे.
🇮🇳 Heartiest congratulations to R. Praggnanandhaa on becoming the Norway Chess 2026 Champion! ♟️🏆
— DESHRAJ SINGH 🇮🇳 (@deshrajsingh56) June 6, 2026
This remarkable achievement is a testament to his exceptional talent, dedication, and unwavering determination. His historic triumph on one of the world's most prestigious chess…
हेही वाचा – जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे वादळी आंदोलन, सोनम वांगचूकही मैदानात!
गुकेशची निराशा, प्रज्ञानंदने सांभाळली भारताची धुरा
काही महिन्यांपूर्वी पाफॉश येथे झालेल्या कॅन्डिडेट्स स्पर्धेत प्रज्ञानंदची कामगिरी अपेक्षेसारखी झाली नव्हती. त्या अपयशाची कसर त्याने या स्पर्धेत भरून काढली. विशेष म्हणजे, भारताचा विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश याच्यासाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. गुकेश या स्पर्धेत सुरुवातीपासूनच लयीत दिसला नाही. अंतिम टप्प्यात तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. यंदाच्या वर्षाच्या उत्तरार्धात गुकेशला आव्हाहनवीर जावोखिर सिंदारोव्हविरुद्ध आपल्या जागतिक विजेतेपदाचा बचाव करायचा आहे, त्या पार्श्वभूमीवर गुकेशचे हे अपयश चिंतेची बाब मानली जात आहे. शेवटच्या फेरीत मॅग्नस कार्लसनने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना गुकेशचा पराभव केला. या विजयानंतरही कार्लसन अवघ्या १३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिला.
मात्र, गुकेश मागे पडल्यानंतरही प्रज्ञानंदने भारताचे आव्हान केवळ जिवंतच ठेवले नाही, तर ते थेट विजेतेपदापर्यंत नेऊन पोहोचवले. चेन्नईत जन्मलेल्या या २० वर्षांच्या खेळाडूने दाखवलेले हे मानसिक धैर्य भारतीय क्रीडा जगताला एक नवी ऊर्जा देणारे आहे.
तज्ज्ञांचे विश्लेषण आणि भविष्यातील परिणाम
या ऐतिहासिक विजयानंतर जगभरातील बुद्धिबळ तज्ज्ञांनी प्रज्ञानंदचे कौतुक केले आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रज्ञानंदची खेळण्याची शैली आता अधिक परिपक्व झाली आहे. सुरुवातीला आक्रमक खेळणारा हा खेळाडू आता बचावात्मक आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत मजबूत झाला आहे. मॅग्नस कार्लसनसारख्या खेळाडूला दबावात आणणे आणि वेस्ली सोसारख्या अनुभवी खेळाडूला मागे टाकणे हे प्रज्ञानंदच्या वाढत्या जागतिक वर्चस्वाची साक्ष देते.
या विजयामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत (FIDE Rankings) प्रज्ञानंदच्या स्थानात मोठी झेप मिळणार आहे. भारतामध्ये विश्वनाथन आनंद यांच्यानंतर बुद्धिबळाचे युग संपले असे वाटत असताना, प्रज्ञानंद, गुकेश आणि अर्जुन एरिगेसी या तरुण ब्रिगेडने भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाची महासत्ता बनवले आहे. प्रज्ञानंदचा हा विजय आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचा आत्मविश्वास गगनात नेणारा ठरेल, यात शंका नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा