रणवीर सिंग विरुद्ध FWICE : तीन नोटीसनंतरही अभिनेत्याची पाठ, बॉलिवूडमध्ये भूकंप!

WhatsApp Group

Ranveer Singh Boycott : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘डॉन’ या चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर या गादीवर आता सुपरस्टार रणवीर सिंग विराजमान होणार होता. मात्र, शूटिंग सुरू होण्यास अवघे तीन आठवडे शिल्लक असताना रणवीर सिंगने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये भूकंप झाला आहे. रणवीरने ‘डॉन ३’ मधून अचानक माघार घेतल्यामुळे चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी कामगार संघटना ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ने अभिनेत्याविरोधात थेट ‘नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहकार्याचा आदेश) जारी केला आहे.

चित्रपट विश्वात हा निर्णय म्हणजे एका प्रकारे अघोषित बहिष्कार मानला जात असून, यामुळे रणवीर सिंगच्या आगामी अडचणींमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तब्बल ४५ कोटींचे नुकसान; काय आहे मूळ प्रकरण?

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ने गेल्या दोन वर्षांपासून ‘डॉन ३’ च्या पूर्व-तयारीवर (Pre-production) कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. चित्रपटाचे परदेशातील शेड्युल, लोकेशन्सची निवड, हॉटेल बुकिंग्स आणि सुमारे २०० हून अधिक तंत्रज्ञ व कामगारांचे व्हिसा आणि प्रवासाचे नियोजन पूर्ण झाले होते. या संपूर्ण प्रक्रियेत रणवीर सिंग स्वतः उपस्थित होता. इतकेच नव्हे, तर चित्रपटाची घोषणा करणारा एक महागडा प्रोमो देखील त्याच्यासोबत शूट करण्यात आला होता.

मात्र, शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या २० ते २१ दिवस आधी रणवीरने स्क्रिप्टमधील बदलांचे कारण पुढे करत या चित्रपटातून काढता पाय घेतला. फरहान अख्तर यांनी यासंदर्भात ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ (IFTDA) कडे रीतसर तक्रार दाखल केली, जी पुढे FWICE कडे सोपवण्यात आली. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, रणवीरच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे सुमारे ४५ कोटी रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे.

🚨 FWICE’s ASHOKE PANDIT –

“Farhan Akhtar wants Rs 45 crores from Ranveer Singh for suddenly exiting Don 3” 😳

“Farhan suffered a loss of ₹45 crore”

“All Technicians, spot boys, Cameramen lost their jobs due to Ranveer Singh”

“Shooting setup had already been planned”

“No… https://t.co/Rz8dC2jvHC pic.twitter.com/bBkl7K72WO— News Algebra (@NewsAlgebraIND) May 25, 2026

हेही वाचा – क्रिकेट सोडून हे काय चाललंय? लंडनच्या मैदानात भारतीय महिला खेळाडूंमी हातात घेतले पाण्याचे फुगे!

“सुपरस्टार नियमांपेक्षा मोठा नाही”; FWICE ची आक्रमक भूमिका

FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी मुंबईत एका तातडीच्या पत्रकार परिषदेत या कारवाईची घोषणा केली. अशोक पंडित यांनी स्पष्ट केले की, “हा थेट बंदी (Ban) हुकूम नाही, कारण आम्ही न्यायालय नाही. परंतु, हा आमच्या ४ लाख कामगार आणि ३० हून अधिक वेगवेगळ्या विभागांमधील तंत्रज्ञांचा अधिकार आहे. जोपर्यंत रणवीर सिंग आमच्याशी आणि निर्मात्यांशी समोरासमोर बसून यावर चर्चा करत नाही, तोपर्यंत आमचा कोणताही सदस्य, मग तो कॅमेरामन असो, लाईटमन असो किंवा स्पॉटबॉय, रणवीर सिंगच्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करणार नाही.”

संघटनेने पुढे सांगितले की, रणवीर सिंगला आपले म्हणणे मांडण्यासाठी सलग तीन वेळा निमंत्रण आणि नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जेव्हा संघटनेने पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले, तेव्हा रणवीरच्या टीमकडून एक ईमेल पाठवण्यात आला, ज्यामध्ये “हे प्रकरण अंतर्गत आणि कराराशी संबंधित असून ते फेडरेशनच्या अखत्यारीत येत नाही,” असे सांगत संवाद साधण्यास नकार देण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या संघटनेने ‘असहकार्याचा’ पवित्रा घेतला आहे.

रणवीर सिंगची बाजू: “मौन राखणे हीच माझी प्रतिष्ठा”

या संपूर्ण वादानंतर रणवीर सिंग पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर अत्यंत साध्या वेशात आणि चेहऱ्यावर मास्क लावून कडक सुरक्षेत स्पॉट झाला. FWICE च्या या आक्रमक भूमिकेनंतर रणवीर सिंगच्या अधिकृत प्रवक्त्याने एक निवेदन प्रसिद्ध करून अभिनेत्याची बाजू मांडली आहे.

“रणवीर सिंगच्या मनात चित्रपटसृष्टीबद्दल आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे. ‘डॉन ३’ च्या संदर्भातील घडामोडींवर त्याने जाणीवपूर्वक मौन बाळगणे पसंत केले आहे, कारण व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे नेहमीच परिपक्वता, प्रतिष्ठा आणि परस्पर आदराने हाताळले पाहिजेत, यावर त्याचा विश्वास आहे. विविध माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, रणवीरला त्यावर सार्वजनिक भाष्य करणे आवश्यक वाटत नाही. त्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या आगामी कामांवर आणि कमिटमेंट्सवर केंद्रित आहे.”

बॉलिवूडमध्ये अंतर्गत मतभेद; कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह

रणवीर सिंगविरोधात घेतलेल्या या कडक पावलामुळे बॉलिवूडमध्ये दोन तट पडले आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांची प्रमुख संघटना ‘सिन्टा’ (CINTAA) च्या अध्यक्षा पूनम धिल्लन यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, रणवीर सिंग हा त्यांच्या संघटनेचा सदस्य असतानाही, ही कारवाई करण्यापूर्वी कोणत्याही पक्षाने ‘सिन्टा’ला विश्वासात घेतले नाही. ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांनीही या विषयावर बोलताना सांगितले की, इंडस्ट्रीतील लोक केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे, कायदेतज्ज्ञांच्या मते FWICE सारख्या खाजगी किंवा स्वायत्त संघटनांनी एखाद्या कलाकारावर असा सामूहिक बहिष्कार टाकणे हे अंशतः बेकायदेशीर ठरू शकते. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या उपजीविकेच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनुसार कोणालाही नाही. त्यामुळे ही कारवाई म्हणजे चित्रपटसृष्टीतील एक प्रकारची ‘खाप पंचायत’ किंवा संघटित मक्तेदारी (Cartel) असल्यासारखे दिसते, अशीही टीका आता सुरू झाली आहे.

भविष्यातील परिणाम आणि रणवीरसमोरील आव्हाने

हा वाद जर लवकर मिटला नाही, तर रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांना मोठा फटका बसू शकतो. जय मेहता दिग्दर्शित आणि हन्सल मेहता निर्मित ‘प्रलय’ हा हाय-बजेट चित्रपट आणि रणवीरच्या अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींचे शूटिंग यामुळे रखडण्याची शक्यता आहे. कारण जाहिरातींमध्ये काम करणारे तंत्रज्ञही याच फेडरेशनचे सदस्य असतात.

विशेष म्हणजे, रणवीर सिंग वादामध्ये अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात ‘कांतारा’ चित्रपटातील एका पवित्र विधीची नक्कल केल्यामुळे त्याच्यावर दक्षिण भारतात प्रचंड टीका झाली होती, ज्याबद्दल नंतर त्याने माफी मागितली होती. आता ‘डॉन ३’ च्या या नव्या वादामुळे रणवीर सिंग या चक्रव्युहातून स्वतःला कसे बाहेर काढतो आणि बॉलिवूडमधील अंतर्गत राजकारणाला काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment