क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटरच होणार हा भ्रम मोडला! अनिल कुंबलेच्या मुलाने कष्टाच्या जोरावर मिळवलं मोठं यश

WhatsApp Group

Anil Kumble son Mayas Kumble : आपल्या मुलाने आपल्याच पाऊलावर पाऊल ठेवून नाव कमवावे, अशी प्रत्येक यशस्वी बापाची इच्छा असते. त्यात तो बाप जर भारतीय क्रिकेटचा देदीप्यमान इतिहास लिहिणारा अनिल कुंबले असेल, तर अपेक्षांचे ओझे अधिकच वाढते. ज्या बापाने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक ६१९ बळी घेतले, ज्याच्या नावावर एकाच डावात १० बळी घेण्याचा ऐतिहासिक विक्रम आहे, त्याचा मुलगा साहजिकच हातात बॅट किंवा बॉल घेईल असा सगळ्यांचा कयास होता. मात्र, नियतीने आणि त्या लहानग्याने स्वतःसाठी एक वेगळीच खेळपट्टी तयार केली होती. अनिल कुंबले यांचा मुलगा मायस कुंबले याने क्रिकेटच्या झगमगत्या दुनियेला नाकारत, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी जे स्वप्न पाहिले होते, ते अखेर अत्यंत दिमाखात पूर्ण करून दाखवले आहे.

अनेक लोकांना स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि आयुष्याचा नेमका उद्देश काय आहे हे शोधण्यात उभं आयुष्य निघून जातं. पण काही मुलं जन्मतःच आपला मार्ग ठरवून आलेली असतात. मायस कुंबलेची कहाणी नेमकी अशीच आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी, जेव्हा मुलं खेळण्यांमध्ये व्यस्त असतात, तेव्हा मायसने आपण भविष्यात काय करणार, हे आपल्या आई-वडिलांना ठामपणे सांगून टाकले होते. नुकतीच त्याने अमेरिकेतील इलिनॉय राज्यामधील शैंपेन या शहरातून आपली इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे. मुलाच्या या यशानंतर अनिल कुंबले आणि त्यांची पत्नी चेतना कुंबले यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

हेही वाचा – NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पुण्यातून गजाआड, प्राध्यापकाने ‘असा’विकला लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास!

“मी इंजिनिअर बनणार!”

अनिल कुंबले यांच्या पत्नी चेतना कुंबले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलाच्या पदवीदान समारंभाचे फोटो शेअर करत एक अत्यंत भावूक आणि डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. एका आईच्या नजरेतून मुलाचा हा प्रवास पाहताना आजच्या पिढीतील पालकांसाठी ही एक मोठी शिकवण ठरू शकते. चेतना यांनी लिहिले की, “मी इंजिनिअर बनणार… तो हा शब्द अशा आत्मविश्वासाने बोलायचा जो आत्मविश्वास फक्त एका निष्पाप बालकातच असू शकतो.”

त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुढे सांगितले की, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी मायस आपल्या छोट्या हातांनी घरातील मेकॅनिकल टूल्स (औजारे) उचलायचा आणि मोठ्या गर्वाने सांगायचा की, तो एक दिवस स्वतःचा नवीन स्कूटर तयार करेल. जसा तो मोठा झाला, तशी त्याच्या स्वप्नांची व्याप्तीही वाढत गेली. वयाच्या सातव्या वर्षी तो थेट कार डिझायनिंगच्या गोष्टी करू लागला होता. इतकेच नाही तर तो अगदी छाती ठोकून सांगायचा की, तो जी कार बनवेल त्याचे नाव ‘MAK’ असे ठेवेल. या ‘MAK’ चा अर्थ दुसरा काही नसून ‘मायस अनिल कुंबले’ असा होता.

पालक म्हणून वाटणारी भीती आणि मुलाने राखलेला शब्द

स्टार किड्सच्या आयुष्यात पालकांचे नाव हे जितके फायद्याचे ठरते, तितकेच ते त्यांच्यावर एक मानसिक दडपण निर्माण करत असते. चेतना कुंबले यांनी आपल्या पोस्टमध्ये या मानसिकतेवरही प्रकाश टाकला आहे. “एक माता-पिता म्हणून, आम्ही त्याच्या बालपणीच्या या स्वप्नांवर हसायचो. मनात फक्त हाच विचार यायचा की, पुढे जाऊन नक्की काय होईल? मुलाचे भविष्य काय असेल? पण आज, त्याला एक यशस्वी इंजिनिअर म्हणून पदवी घेताना पाहताना मला एका सुंदर गोष्टीची जाणीव झाली आहे. कधीकधी ही लहान मुलं या जगाला समजण्यापूर्वीच स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखून असतात.”

आपल्या मुलाला हृदयात एकच ध्येय ठेवून ते पूर्ण करताना पाहणे हा कोणत्याही माता-पित्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. चेतना कुंबले यांनी हीच भावना व्यक्त करत म्हटले की, ज्या लहान मुलाने वर्षांपूर्वी मला वचन दिले होते की तो इंजिनिअर बनेल, त्याने आज ते वचन पाळले आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.

क्रिकेटच्या ग्लॅमरपासून दूर शोधली स्वतःची वाट

आजच्या काळात जिथे आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पैशांचा आणि प्रसिद्धीचा पाऊस पडत आहे, तिथे अनिल कुंबले यांच्यासारख्या दिग्गजाचा मुलगा कोणत्याही आकर्षणाला बळी न पडता स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. मायसने अमेरिकेतील अत्यंत नामांकित अशा विद्यापीठातून ही पदवी संपादन केली आहे. या प्रवासात त्याने कधीही आपल्या वडिलांच्या नावाचा किंवा वलयाचा गैरवापर केला नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment