तब्बल महिनाभराचे उद्दिष्ट, रोज २० घरांना भेटी! पेट्रोलच्या संकटावर मात करत शिक्षकाने दाखवून दिली कर्तव्याची व्याख्या

WhatsApp Group

Jharkhand teacher horse census : वाढत्या महागाईने आणि पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. इंधनासाठी पेट्रोल पंपावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि खिसा रिकामा करणारी दरवाढ यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, संकटाचे रूपांतर संधीत कसे करावे, हे झारखंडमधील एका सरकारी शिक्षकाने आपल्या अनोख्या कृतीतून दाखवून दिले आहे. पेट्रोल परवडत नाही आणि पंपावर वेळ वाया घालवणे शक्य नाही, म्हणून या शिक्षकाने गॅरेजमधून बाईक बाहेर काढण्याऐवजी गोठ्यातून थेट आपला घोडाच बाहेर काढला आणि त्यावर स्वार होऊन देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले जनगणनेचे काम सुरू केले आहे.

सफेद युनिफॉर्म, डोक्यावर अधिकृत जनगणनेची सरकारी टोपी, गळ्यात ओळखपत्र आणि खाली रुबाबदार तपकिरी रंगाचा घोडा अशा थाटात जेव्हा हे मास्तर गावात प्रवेश करतात, तेव्हा अख्खे गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा होते. सोशल मीडियावर सध्या या ‘माटसाबां’चा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यांच्या या अनोख्या ‘स्वॅग’चे आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचे देशभरातून कौतुक होत आहे.

कोण आहेत हे अनोखे शिक्षक?

महागड्या पेट्रोलला आपल्या घोड्याने उत्तर देणाऱ्या या शिक्षकाचे नाव मुन्ना प्रसाद गुप्ता असे आहे. ते झारखंडच्या गडवा जिल्ह्यातील धुरकी ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या टाटीडीरी गावातील ‘उत्क्रमित उच्च विद्यालया’त (Upgraded High School) सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिजिटल जनगणनेचे काम सुरू आहे. या अंतर्गत मुन्ना गुप्ता यांच्यावर घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करणे आणि गावाचा ‘नजरी नक्शा’ (भौगोलिक आराखडा) तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

‘घरी आहे घोडा, तर काहे का रोना?’

आपल्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाबद्दल बोलताना मुन्ना गुप्ता यांनी सांगितले की, सध्या परिसरात पेट्रोलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यातच किमती एवढ्या वाढल्या आहेत की रोज बाईकने फिरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. “पेट्रोल सहज मिळत नव्हते आणि पंपावर तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. अशात शासनाने दिलेल्या जबाबदारीच्या कामात वेळ वाया घालवण्यापेक्षा मी दुसरा पर्याय शोधायचा ठरवला. आमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या घोडे पाळण्याची परंपरा आहे. मी लहानपणीच वडिलांकडून घुडसवारी शिकलो होतो. त्यामुळे मी विचार केला की जेव्हा घरात स्वतःचा घोडा आहे, तर उगीच पेट्रोलसाठी रडत बसण्यात काय अर्थ आहे?” असे मुन्ना यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – दारू शौकिनांना मोठा दिलासा! अखेर मद्य स्वस्त; देशात पहिल्यांदाच लागू झाला ‘हा’ नवा टॅक्स फॉर्म्युला

कच्च्या रस्त्यांवर बाईक फेल, मास्तरांचा घोडा पास

या भागात केवळ पेट्रोलचीच समस्या आहे असे नाही, तर भौगोलिक परिस्थितीही अत्यंत खडतर आहे. अनेक गावे आणि पाडे अशा ठिकाणी आहेत जिथे जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अत्यंत अरुंद पायवाटा, चिखल आणि चढ-उताराच्या रस्त्यांवरून दुचाकी चालवणे अत्यंत कठीण आणि अपघाताला निमंत्रण देणारे ठरते. अशा दुर्गम आणि कठीण मार्गांवर मुन्ना गुप्ता यांचा घोडा अतिशय लिलया आणि वेगाने प्रवास करतो. जिथे बाईक पोहोचू शकत नाही, तिथे मास्तरांचा घोडा अगदी सहज पोहोचतो, ज्यामुळे त्यांचे काम अधिक सोपे झाले आहे.

स्मार्टफोन युगातील मुलांना प्रत्यक्ष घोड्याचे दर्शन

मुन्ना मास्तरांच्या या घोड्यामुळे गावातील लहान मुलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आजच्या डिजिटल आणि स्मार्टफोनच्या युगात ग्रामीण भागातील अनेक लहान मुलांनी प्रत्यक्ष घोडा कधी पाहिलाच नव्हता. ते केवळ पुस्तकात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर घोडा पाहत असत. त्यामुळे जेव्हा मुन्ना सर घोड्यावरून त्यांच्या दारात येतात, तेव्हा मुले अत्यंत उत्साहाने घोड्याला पाहण्यासाठी आणि त्याला हात लावण्यासाठी गर्दी करतात.

कर्तव्याची जाणीव आणि आव्हाने

मुन्ना गुप्ता जनगणनेच्या या कामाला केवळ एक सरकारी ड्युटी मानत नाहीत, तर ती देशाप्रती असलेली एक मोठी जबाबदारी समजतात. “जर भारत सरकारने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे, तर ती वेळेत आणि पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

झारखंडमध्ये १६ मे पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून ही मोहीम १४ जूनपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत संपूर्ण राज्यात घर-घर जाऊन डिजिटल पद्धतीने आकडेवारी गोळा केली जात आहे. मुन्ना गुप्ता यांच्या मते, हे काम पूर्ण करण्यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागेल. रोज ५ ते २० घरांना भेटी दिल्या जातात. अनेकदा दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल अ‍ॅप काम करत नाही, तर कधी लोक घरात भेटत नाहीत. अशा वेळी एकाच घरावर दोन ते तीन वेळा जावे लागते. या सर्व अडचणींवर मात करत मुन्ना मास्तर आपला प्रवास घोड्यावरून अखंडपणे सुरू ठेवून इतर कर्मचाऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण करत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment