Man Digs Up Sister’s Skeleton : ओडिशामधील केओंझार जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील अवघ्या १९,३०० रुपयांची शिल्लक रक्कम मिळवण्यासाठी एका हतबल भावाला चक्क आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेपर्यंत पायपीट करावी लागली. कागदपत्रांच्या जाचापुढे माणुसकी कशी हतबल होते, याचे हे अत्यंत विदारक उदाहरण ठरले आहे.
नेमकी घटना काय?
केओंझार जिल्ह्यातील दियानाली गावातील जितू मुंडा यांची बहीण काकरा मुंडा हिचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. काकरा हिचे मलिपासी येथील ओडिसा ग्राम्य बँकेत खाते होते आणि त्यामध्ये १९,३०० रुपये शिल्लक होते. काकराच्या पतीचा आणि एकुलत्या एका मुलाचा आधीच मृत्यू झाला असल्याने, जितू हाच तिचा एकमेव वारसदार उरला होता. अत्यंत गरिबीत जगणाऱ्या जितूला आपल्या बहिणीच्या अंत्यविधीनंतर उरलेल्या पैशांची नितांत गरज होती.
ओडिशाच्या केओंझारमध्ये एका अगतिक भावाला आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील अवघ्या १९,३०० रुपयांसाठी काय करावं लागलं, हे ऐकून तुमचंही काळीज पिळवटून निघेल. बँकेने कागदपत्रांची मागणी केली, पण अडाणी भावाकडे काहीच नव्हतं. अखेर संताप आणि हतबलतेपोटी त्याने हा प्रकार केला🏛️💀#OdishaNews pic.twitter.com/EaXqsAM8IQ
— Vacha Marathi (@VachaMarathi) April 28, 2026
हेही वाचा – मुंबईच्या नया नगरमध्ये खळबळ : सुरक्षारक्षकांचा धर्म विचारून चाकूने हल्ला; अमेरिकेहून परतलेल्या तरुणाला अटक!
बँकेचा तांत्रिक अडथळा आणि भावाची हतबलता
जितू जेव्हा आपल्या बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत गेला, तेव्हा बँकेच्या व्यवस्थापकांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. बँकेने सांगितले की, एक तर खातेदार स्वतः उपस्थित असायला हवा किंवा जितूने त्याचे अधिकृत वारसदार असल्याचे कायदेशीर पुरावे आणि मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे. जितू हा एक अशिक्षित आदिवासी व्यक्ती असल्याने त्याला या तांत्रिक प्रक्रियेची आणि कागदपत्रांची काहीही माहिती नव्हती. त्याच्याकडे बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा सक्सेशन सर्टिफिकेट (Succession Certificate) नव्हते. वारंवार विनंती करूनही बँकेने दाद न दिल्याने जितू हताश होऊन परतला.
स्मशान उकरून काढला बहिणीचा सांगाडा
बँकेच्या वागण्याने संतापलेल्या आणि हतबल झालेल्या जितूने सोमवारी एक टोकाचे पाऊल उचलले. तो गावातील स्मशानभूमीत गेला आणि त्याने आपल्या बहिणीचे थडगे उकरून तिचे अवशेष बाहेर काढले. बहिणीचा सांगाडा एका कपड्यात गुंडाळून त्याने तो आपल्या खांद्यावर घेतला आणि भर उन्हात ३ किलोमीटरची पायपीट करत तो थेट बँक गाठली.
बँकेच्या दारात सांगाडा पाहून गावकरी सुन्न
बँकेच्या परिसरात जेव्हा जितू आपल्या बहिणीचा सांगाडा घेऊन पोहोचला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे पाय जमिनीला खिळले. हा प्रकार पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, तर काही लोकांनी बँकेच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त केला. “एका गरीब माणसाला त्याचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी इतकी लाचारी सोसावी लागते का?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. बँकेचे अधिकारी हवे तर सरपंचांकडून शहानिशा करू शकले असते किंवा गावात येऊन चौकशी करू शकले असते, पण माणुसकीपेक्षा कागदपत्रांना महत्त्व दिले गेले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पोलिसांची मध्यस्थी आणि आश्वासन
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जितूला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहिले जाईल आणि जितूला त्याचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल. तसेच, या संदर्भात बँकेकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
या घटनेने सरकारी व्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रातील नियमांच्या नावाखाली होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. एका अगतिक भावाला आपल्या बहिणीच्या अस्थींची विटंबना करावी लागली, ही घटना सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी ठरली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!