NEET परीक्षेची नवी तारीख जाहीर! 22 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; विद्यार्थ्यांनो पुन्हा तयार व्हा!

WhatsApp Group

NEET UG 2026 Re-exam date : देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ म्हणजेच नीट-युजी (NEET UG 2026) परीक्षेची नवी तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अखेर जाहीर केली आहे. पेपर लीक आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर रद्द झालेली ही परीक्षा आता रविवार, २१ जून २०२६ रोजी देशभरात पुन्हा आयोजित केली जाणार आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रमात असलेल्या २२ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुन्हा नोंदणीची गरज नाही, अतिरिक्त फीचा भार नाही

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे की, जे विद्यार्थी ३ मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेला बसले होते, त्यांना फेरपरीक्षेसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची किंवा नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने या फेरपरीक्षेला मंजुरी देताना विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकला नाही. कोणत्याही विद्यार्थ्याकडून पुन्हा परीक्षा शुल्क (Exam Fee) घेतले जाणार नाही.

काय आहे ‘नीट’ पेपर लीक प्रकरण?

३ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेनंतर राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की, परीक्षेच्या कित्येक दिवस आधीच एक ‘गेस पेपर’ किंवा ‘क्वेश्चन बँक’ विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होता. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली.

हेही वाचा – NEET-UG पेपरफुटीचा महाघोटाळा: ५ लाखांचे ‘रेट कार्ड’ आणि व्हॉट्सअ‍ॅप रॅकेट; CBI कडून पैशांच्या व्यवहारांचा पर्दाफाश

तपासाचे प्रमुख आणि एडीजी विशाल बन्सल यांच्या माहितीनुसार, एका ४१० प्रश्नांच्या गेस पेपरमधील तब्बल १२० प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत आले होते. यामध्ये जीवशास्त्र (Biology) चे ९० आणि रसायनशास्त्र (Chemistry) चे ४५ प्रश्न समाविष्ट होते. ७२० गुणांच्या या परीक्षेत साधारण ६०० गुणांचे प्रश्न आधीच फुटले असल्याचा संशय आहे.

५ लाखांपासून ३० हजारांपर्यंत सौदा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लीक झालेला पेपर सुरुवातीला ५-५ लाख रुपयांना विकला गेला. मात्र, परीक्षेच्या आदल्या रात्री त्याची किंमत घसरून ३० हजार रुपयांपर्यंत खाली आली होती. मोबाईलमध्ये ‘फॉरवर्डेड मेनी टाइम्स’ असे मेसेज दिसत असल्याने हा पेपर किती हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असेल, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

केरळ कनेक्शन आणि सीबीआय तपास

या संपूर्ण प्रकरणाची मूळ धागेदोरे केरळमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी जोडले गेले आहेत. या विद्यार्थ्याने १ मे रोजी सीकरमधील आपल्या मित्राला हे प्रश्न पाठवले होते. त्यानंतर एका पीजी (PG) चालकाकडून हे प्रश्न कोचिंग क्लासेस आणि करिअर काउन्सिलर्सपर्यंत पोहोचले. सध्या सीबीआय या संपूर्ण गुन्हेगारी जाळ्याचा छडा लावत आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मदत

परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र (Admit Card) किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट NTA शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • ईमेल आयडी: neet-ug@nta.ac.in
  • हेल्पलाईन नंबर: 011-40759000 / 011-69227700

२१ जून रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी NTA कडून कडक सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शकतेची हमी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment