25 आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारे भारताचे दिग्गज शूटर जसपाल राणा यांचे निधन

WhatsApp Group

Jaspal Rana Death News : भारतीय क्रीडा जगतातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. भारताचे महान नेमबाज (शूटर) आणि देशातील अव्वल दर्जाचे हाय परफॉर्मन्स पिस्तूल कोच जसपाल राणा यांचे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी दुखाद निधन झाले आहे. अचूक निशाणा, अद्भूत एकाग्रता आणि भारतीय नेमबाजीला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारा एक सुवर्णकाळ आज संपला आहे. १२ जून रोजी दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) त्यांच्या निधानाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, या बातमीने संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जर्मनीतील म्युनिक येथे पार पडलेल्या आयएसएसएफ (ISSF) शूटिंग वर्ल्ड कपमध्ये ते भारतीय पिस्तूल टीमसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते. २४ ते ३१ मे २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेनंतर मायदेशी परतत असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. नवी दिल्लीत पोहोचताच त्यांना तातडीने साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, १२ जूनच्या सकाळी त्यांची प्रकृती कमालीची खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या पन्नाशीच्या आतच एका महान खेळाडूने आणि मार्गदर्शकाने जगाचा निरोप घेतल्याने क्रीडा क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – FIFA World Cup 2026 : पंचांचं इंग्रजी ऐकून खेळाडू चक्रावले; फॅन्सना हसू अनावर, व्हिडिओ व्हायरल!

तीन दशकांचे योगदान अन् देशात शूटिंगची क्रांती

जसपाल राणा हे केवळ एक खेळाडू नव्हते, तर ते भारतीय नेमबाजीच्या इतिहासातील एक क्रांती होते. १९९० च्या दशकात जेव्हा भारतात शूटिंग या खेळाला आजच्यासारखी ग्लॅमरस ओळख किंवा पुरेशा पायाभूत सुविधा नव्हत्या, अशा काळात जसपाल राणा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या बंदुकीची चुणूक दाखवली. एक चॅम्पियन अ‍ॅथलीट आणि त्यानंतर एक कडक शिस्तीचा यशस्वी प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ देशाची सेवा केली.

१९९० च्या दशकात त्यांनी आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ (कॉमनवेल्थ गेम्स) आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचा तिरंगा सातत्याने उंचावला. रेंजवर उभं राहून अचूक वेध घेण्याची त्यांची शैली पाहून देशातील हजारो तरुणांनी हातात पिस्तूल धरण्याची प्रेरणा घेतली. आज भारत नेमबाजीत जगात महासत्ता मानला जातो, त्याचे बीज रोवणाऱ्या प्रमुख शिलेदारांमध्ये जसपाल राणा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

आठ आशियाई पदके आणि विश्वविक्रमाची बरोबरी

जसपाल राणा यांच्या वैयक्तिक कारकिर्दीचा आलेख थक्क करणारा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास २५ पदकांची कमाई केली. आशियाई खेळांमध्ये (Asian Games) त्यांनी एकूण ८ पदके देशाच्या झोळीत टाकली. यामध्ये १९९४ च्या हिरोशिमा आशियाई खेळांमधील ऐतिहासिक सुवर्णपदकाचा समावेश होता, ज्याने त्यांना स्टार बनवले. त्यानंतर २००६ च्या दोहा आशियाई खेळांमध्ये त्यांनी तब्बल तीन सुवर्णपदके जिंकून नवा इतिहास रचला. याच दोहा स्पर्धेत त्यांनी २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती.

राष्ट्रकुल खेळांच्या (Commonwealth Games) इतिहासात तर ते भारताचे सर्वात यशस्वी अ‍ॅथलीट राहिले आहेत. १९९४, १९९८, २००२ आणि २००६ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये त्यांनी एकूण १५ पदके जिंकली, ज्यामध्ये ९ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे. याशिवाय १९९४ मध्ये मिलान येथे झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले होते.

वयाच्या १८ व्या वर्षी ‘अर्जुन’ तर २०२० मध्ये ‘द्रोणाचार्य’

त्यांच्या या अफाट कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी (१९९४ मध्ये) त्यांना ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित केले होते. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांना देशाचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कोचिंगमध्ये जे अतुलनीय योगदान दिले, त्यासाठी २०२० मध्ये त्यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च प्रशिक्षक पुरस्कार म्हणजेच ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

सौरभ चौधरी ते मनू भाकर: चॅम्पियन्स घडवणारी फॅक्टरी

आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला निरोप दिल्यानंतर जसपाल राणा यांनी स्वतःला कोचिंग क्षेत्रासाठी वाहून घेतले. २०१२ मध्ये त्यांनी भारताच्या ज्युनियर पिस्तूल प्रोग्रामची धुरा हाती घेतली. पुढच्या एका दशकात त्यांनी भारतीय शूटिंगमध्ये टॅलेंटची अशी काही पाइपलाइन तयार केली, ज्यातून एकामागून एक जागतिक दर्जाचे शूटर्स देशाला मिळाले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या प्रमुख खेळाडूंमध्ये सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या अव्वल शूटर्सचा समावेश आहे. अत्यंत कठीण आणि दबावाच्या परिस्थितीत खेळाडूंचे मानसिक संतुलन कसे राखायचे, याचे कसब राणा यांच्याकडे होते. ते सरावादरम्यान हुबेहूब आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखी परिस्थिती निर्माण करायचे, जेणेकरून खेळाडू मुख्य स्पर्धेत दडपणाखाली येणार नाहीत.

मनू भाकरच्या ऑलिम्पिक यशाचे खरे शिल्पकार

जसपाल राणा यांच्या कोचिंग कारकिर्दीतील सुवर्णक्षण २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाला. स्टार नेमबाज मनू भाकर हिच्या कारकिर्दीत एक असा टप्पा आला होता, जेव्हा ती प्रचंड खराब फॉर्मातून जात होती आणि तिने खेळ सोडण्याचा विचार केला होता. अशा कठीण काळात जसपाल राणा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी मनूच्या तंत्रात सुधारणा केली आणि तिच्यातील गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला.

याच गुरु-शिष्याच्या जोडीने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि मिक्स्ड टीम १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोन कांस्य पदके जिंकून नवा इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली. या यशाचे श्रेय मनूने जाहीरपणे तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांना दिले होते.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही न भरून निघणारी पोकळी

खेळाप्रती असलेले त्यांचे समर्पण पाहून फेब्रुवारी २०२५ मध्ये नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) त्यांची २५ मीटर पिस्तूल प्रकारासाठी भारताचे ‘हाय परफॉर्मन्स कोच’ म्हणून नियुक्ती केली होती. मृत्यूपूर्वाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते भारतीय शूटिंगच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेले होते आणि देशातील सर्वोत्तम शूटर्सना ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांसाठी तयार करत होते.

म्युनिक वर्ल्ड कप २०२६ वरून परतल्यानंतर अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या समस्येने अवघ्या ४९ व्या वर्षी या महान मार्गदर्शकाला आपल्यातून हिरावून नेले आहे. जसपाल राणा यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. भारताला नेमबाजीच्या खेळात ‘विश्वगुरू’ बनवणाऱ्या या द्रोणाचार्याला संपूर्ण देशाकडून आणि क्रीडा प्रेमींकडून साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment