बार्शीचा महावीर कदम ठरला ‘फुल आयर्न मॅन’; मलेशियात 226 किमी अंतर पार करून भारताचा झेंडा फडकावला!

WhatsApp Group

Mahavir Kadam Ironman : बार्शीचा तरुण महावीर कदम याने जगातील सर्वात कठीण क्रीडा मानल्या जाणाऱ्या ‘फुल आयर्न मॅन’ पदावर आपले नाव कोरले आहे. मलेशियातील सुंदर पण आव्हानात्मक लंगकावी बेटावर पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने तब्बल 226 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत भारताचा आणि बार्शीचा अभिमान उंचावला आहे.

1 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या रेसमध्ये महावीर कदमने 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर डोंगराळ मार्गावर सायकलिंग, आणि 42.2 किलोमीटर मॅरेथॉन रनिंग
असे तीनही कठीण टप्पे केवळ 16 तास 28 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केले.

“हार मानायची नाही” – जिद्दीचा प्रवास

या प्रवासात महावीरने केवळ स्पर्धा नव्हे तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक संघर्षाची खरी कहाणी जगासमोर ठेवली आहे. रेसदरम्यान त्याच्या सायकलचा गिअर कॉलर तुटला, ट्रॅकिंग बंद पडलं, आणि उष्ण हवामानामुळे शरीर थकून गेलं. तरीही त्याने ठरवलं “काहीही झालं तरी ही रेस पूर्ण करायचीच!”

महावीर म्हणतो, “सायकलचा गिअर बंद पडल्यावर क्षणभर वाटलं, सगळं संपलं. पण मग मनात आलं, इतक्या महिन्यांच्या मेहनतीचा शेवट असा होऊ देणार नाही! फक्त एका गिअरमध्ये सायकल चालवली, पण थांबलो नाही.”

हेही वाचा – ‘राहुल गांधी, तुम्ही लग्न कधी करणार?’, चिमुकल्या यूट्यूबरचा निरागस प्रश्न, उत्तर ऐकून सगळेच हसले!

दोन देशांत आयर्न मॅन पदवी मिळवणारा मराठी खेळाडू

यापूर्वीही महावीरने ऑस्ट्रेलियात आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करून आपलं कौशल्य सिद्ध केलं होतं. आता त्याने दुसऱ्या देशात म्हणजे मलेशियातही ही कामगिरी केली आहे. त्यामुळे तो दोन वेगवेगळ्या देशांतील ‘आयर्न मॅन फिनिशर’ बनला आहे, जे अतिशय दुर्मिळ आणि अभिमानास्पद यश आहे.

 “संघर्ष म्हणजेच प्रवास”

महावीर म्हणतो, “ही रेस फक्त एक क्रीडा स्पर्धा नाही, तर जीवनाचा आरसा आहे. कधी चढ, कधी उतार, कधी हार — पण प्रत्येक वेळी स्वतःला उभं करायचं असतं. यश हे शेवट नाही, संघर्ष हा प्रवासाचा खरा गाभा आहे. हार मानायची नाही, हेच खरे आयुष्याचं सूत्र!”

बार्शीसारख्या छोट्या शहरातून जागतिक स्तरावर अशी कामगिरी घडवणं म्हणजे महाराष्ट्रासाठीही गौरवाचा क्षण आहे. स्थानिक खेळाडूंना महावीर कदमचा हा प्रवास नक्कीच नवी प्रेरणा देईल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment