Heartbeat Limit Myth : फिटनेसच्या दुनियेत नेहमी चर्चा असते, दररोज किती तास व्यायाम करावा, किती पावले चालावी, किंवा एका दिवसात किती कॅलरी खर्च होतात. आपल्या स्मार्टवॉचमध्ये आपण हे सर्व पाहतो. पावले, कॅलरी आणि हृदयाची धडधड (Heart Rate). पण, या “धडधडी”कडे आपण खरंच लक्ष देतो का?
ब्रिटनमधील बर्मिंघम युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी या प्रश्नावर सखोल संशोधन केलं. त्यांचा उद्देश होता, “एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात हृदय ठराविक वेळाच धडधडतं का?” आणि “जर व्यायामामुळे हृदय जास्त वेगाने धडधडत असेल, तर आयुष्य कमी होतं का?”
वैज्ञानिकांचा मोठा अभ्यास
JACC: Advances या नामांकित संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी टॉप अॅथलीट्स आणि Tour de France सायकलपटूंच्या फिटनेस अॅप डेटा चे विश्लेषण केले. त्यांनी पाहिलं की सामान्य लोकांच्या तुलनेत हे प्रशिक्षित खेळाडू आरामाच्या स्थितीत (Resting Heart Rate) कमी धडधड अनुभवतात.
संशोधनानुसार, या खेळाडूंनी दररोज साधारण 11,500 धडधडी ‘वाचवल्या’. म्हणजेच, त्यांचं हृदय व्यायामाच्या वेळी जरी वेगानं धडधडत असलं, तरी विश्रांतीच्या वेळी ते इतकं शांत असतं की त्यांची एकूण हृदयधडधड सामान्य लोकांइतकीच राहते – किंबहुना त्याहून कमी!
व्यायामामुळे आयुष्य कमी होत नाही, वाढतं!
शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे की व्यायाम केल्याने हृदय जास्त धडधडतं म्हणून आयुष्य कमी होत नाही. उलट, नियमित व्यायाम करणाऱ्यांचं हृदय अधिक मजबूत आणि कार्यक्षम होतं. त्यांची Resting Heart Rate कमी असते, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी पडतो आणि ते दीर्घकाळ निरोगी राहतं.
Tour de France मधील सायकलपटूंच्या बाबतीत वैज्ञानिकांनी निरीक्षण केलं की त्यांच्या हृदयाची एकूण धडधड 35,000 वेळा अधिक झाली, तरीही त्यांचं आरोग्य उत्कृष्ट राहिलं आणि त्यांचा फिटनेस स्तर सामान्य लोकांपेक्षा कितीतरी वरचा होता.
मात्र, हृदयगतीचे संकेत दुर्लक्षित करू नका
संशोधनकर्त्यांनी सांगितलं की हा अभ्यास केवळ हृदयगतीच्या पॅटर्नपुरता मर्यादित आहे. रक्तदाब, ऑक्सिजन लेव्हल किंवा स्ट्रेस यांचा विचार यात नाही. तरीही, हृदयगती हा आपल्या शरीराचा एक स्पष्ट संकेतक आहे – ती सांगते की आपलं शरीर जीवनातील ताणतणावाशी कसं जुळवून घेतं आहे.
आरामाच्या अवस्थेत हृदयाची गती खूप जास्त राहणं हे हृदयविकार, स्ट्रोक आणि अकाली मृत्यूच्या धोका वाढवू शकतं. त्यामुळे, फिटनेस अॅप्सवर दिसणारे Heart Rate Alerts हे फक्त नंबर नसून, आपल्या आरोग्याचे चेतावणी सिग्नल असतात.
दीर्घकालीन संशोधनाची गरज
शास्त्रज्ञ म्हणतात की अजून दीर्घकालीन अभ्यासांची गरज आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे — व्यायाम म्हणजे आयुष्य कमी नाही, तर निरोगी आणि दीर्घ आयुष्याचं सूत्र आहे. हृदयगतीचं निरीक्षण हे आता प्रत्येकासाठी आरोग्य-जागृतीचा एक भाग बनलं पाहिजे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा